उज्ज्वल निकमांच्या जुन्या व्हिडीओमुळे काँग्रेसने घेरलं……..

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रविवारी पार पडलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केंद्रीय नेते अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह यांनी हिंदुत्त्व आणि यूपीए सरकारच्या काळातील कारभाराबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab) याचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शाह यांनी म्हटले की, स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. पण शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्या या वक्तव्याची क्लीप सध्या काँग्रेस पक्षाकडून व्हायरल केली जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रवक्ते उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अमित शाह यांनी धादांत खोटे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओत उज्ज्वल निकम स्पष्टपणे म्हणत आहेत की, अजमल कसाबविरोधात कोर्टात खटला सुरु होता तेव्हा एका सुनावणीवेळी मी कसाबने मटण बिर्याणीची मागणी केल्याचे कुठेही म्हटले नाही. मी कोर्टात केवळ कसाबने मटण बिर्याणीची मागणी केली का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी कसाबने तुरुंगात मटण बिर्याणीची मागणी केल्याची बातमी पसरवली. तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कसाबसारख्या क्रूर दहशतवाद्याने मटण बिर्याणी मागितली, असे सांगत रान उठवले. पण यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे उज्ज्वल निकम यांनी ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात म्हटले होते.

हाच धागा पकडत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उज्ज्वल निकम यांनी भाजपचा खोटारडेपणा याआधीच उघडा पाडला होता. पण भाजपाची मुजोरी चालूच आहे . “खोटं बोल पण रेटून बोल” ही प्रवृत्ती गुजरातमध्ये चालत असेल पण महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शरद पवार महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे म्होरके

शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक रुप दिले, अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली. तर महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब’ असून त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केले. राज्यात जेव्हा पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार येत तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. त्यामुळे आताही मराठा आरक्षण हवे असल्यास राज्यात भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!