सावे माध्यमिक विद्यालयाची रामलिंग येथे एक दिवसीय वनभोजन सहल संपन्न
सावे माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रभेटी अंतर्गत एक दिवसीय वनभोजन सहल दिनांक 31-08-2024 रोजी धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावाजवळील रामलिंग या ठिकाणी भेट देण्यासाठी सकाळी ठीक 9 वा. रवाना झाली.
सकाळी ठीक अकरा वाजता तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पोहचलो. हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व आहे .येथून दर्शन आटोपल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावालगत असलेल्या रामलिंग मंदिर पाहण्यासाठी दुपारी 1:00 वाजता पोहोचलो.
रामलिंग हे येडशी गावालगत बालघाटात निसर्गरम्य पर्यावरणात वसलेले मंदिर आहे. पावसाळ्यात पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला असतो. रामलिंग मंदिराच्या परिसराभोवती धबधबा हा बारा महिन्यापैकी आठ ते नऊ महिने संत गतीने सतत वाहत असतो. प्रभुरामचंद्रांच्या नावावरून या ठिकाणाला रामलिंग हे नाव पडले आहे .प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाचा प्रवास करून त्यांना आपल्या सोबत बालघाटाच्या याच मार्गाने लंकेच्या दिशेने घेऊन जात होता ..तेव्हा जटायु पक्षाने रावणाचा मार्ग याच ठिकाणी अडवला परंतु रावणाच्या शक्ती पुढे जटायू पक्षाची शक्ती कमी पडली व जटायु पक्षी घायाळ झाला. घायाळ जटायूला तिथेच सोडून रावण मात्र सीतामातेला सोबत घेऊन लंकेच्या दिशेने पुढे गेला.
नंतर प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात लक्ष्मणासोबत या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्यांना जटायू पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. जटायू पक्षी जखमी अवस्थेत प्रभूरामचंद्राला रावणाचा मार्ग व घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा प्रभू रामचंद्राने एका जागेवर बाण मारून पाणी काढले आणि जटायुला पाणी पाजले आणि आज त्या ठिकाणाला रामबाण म्हणून ओळखले जाते. महादेवाच्या मंदिराला रामाने भेट दिल्यामुळे या ठिकाणाला रामलिंग असे नाव पडले आहे अशी ही आख्यायिका या रामलिंग देवस्थानची सर्व विद्यार्थ्यांना माहीत करून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून या निसर्गरम्य परिसरात वनभोजनाचा मनसोक्त आनंद घेतला.
तसेच तेथे असणाऱ्या धबधब्यामध्ये पडणारे पाणी पाहून सर्वजण प्रफुल्लीत झाली होती .तेथे असणारी वानरे विद्यार्थ्यांना अधिकच आकर्षित करत होती. अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी हसत खेळत, मौज- मजा करत आनंदाने या वनभोजनाचा आस्वाद घेतला. या वनभोजन सहलीमध्ये एकूण 5शिक्षक, 4 शिक्षकेतर कर्मचारी व 72 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक रामलिंग येथून ठीक चार वाजता विद्यालयाकडे रवाना झाली
विद्यालयात सायंकाळी सात वाजता पोहोचली. ही वनभोजन सहल पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर ,सहल प्रमुख श्री मेटकरी सर तसेच गावडे सर , बर्गे सर,अनुसे सर व इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. अशाप्रकारे एक दिवसीय वनभोजन सहल खूप उत्साहात व आनंदात संपन्न झाली.