माढा लोकसभेची जागा महाविकास आघाडीने धनगर समाजाला द्यावी
सांगोला/प्रतिनिधी- माढा लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाला सुटली असून या मतदार संघातून सुरुवातीला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब हे इच्छुक होते. परंतु महाविकास आघाडीने धनगर समाज आपल्या पासून दूर जाईल या भीती पोटी परभणीची जागा महादेवजी जानकार साहेब यांना देऊन तिथून त्यांना लढण्याची संधी दिलेली आहे. परंतु महाविकास आघाडीने आता पर्यंत एकाही जागेवर महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज असणाऱ्या समाज्याला संधी दिलेली नाही.
२०१४ सालचा अपवाद वगळता धनगर समाज नेहमीच काँग्रेस पक्ष व त्यांच्या मित्रपक्षा सोबत राहिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जर जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर महाविकास आघाडीने धनगर समाज्याला सुद्धा संधी दिली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून माढा मतदार संघात सर्व सामान्य धनगर समाज्याला असे वाटते कि महाविकास आघाडीने धनगर समाज्याला उमेदवारी देऊन समाज्याला न्याय द्यावा. तरच बारामती लोकसभा मतदार संघाचे व माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे गणित जुळून येईल. व या दोन्हीही मतदार संघातील उमेदवार निवडून यायला मदत होईल. अन्यथा या दोन्ही मतदार संघात वेगळे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
माढा लोकसभा मतदार संघात एकूण २० लाखाच्या आसपास मतदान आहे. त्यातील ६ ते ७ लाखाच्या आसपास मतदान हे निवळ धनगर समाज्याचे असून अंदाजे ३५% एवढी मोठी मतदार संख्या ही केवळ धनगर समाज्याची असूनही ही इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने नेहमीच धनगर समाज्याची उपेक्षा केलेली आहे. सध्या धनगर समाज्यामध्ये सुद्धा शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे प्रत्येक तरुणाला चांगले वाईट समजायला लागले आहे. जो पक्ष किंवा पार्टी धनगर समाज्याची उपेक्षा करेल त्याची उपेक्षा हा समाज केल्या शिवाय राहणार नाही. आणि जो पक्ष किंवा पार्टी धनगर समाज्याला विकासाच्या प्रवाहात यायला मदत करेल त्या पक्षाला किंवा पार्टीला धनगर समाज डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच महविकास आघाडीने माढा लोकसभा मतदार संघात धनगर समाज्याला उमेदवारी देऊन धनगर समाज्याची अवहेलना थांबवावी.