politicalmaharashtra

उत्स्फूर्तपणे  मतदान करा…

लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. सोलापूर, माढा  या  मतदार संघात तमाम मतदार आपल्या लोकशाहीचा हक्क  बजावतील .मतदान म्हणजे जणू  लोकशाहीचा उत्सव असतो.कारण मतदार देशाच्या भवितव्याचा फैसला करत असतो. सरकार निवडून  देण्याचे एक महान साधन घटनेने भारतीयांना उपलब्ध करून दिले आहे.आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने  सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. अशा या भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात असतो.मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे.

 

मतदार  हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र  हक्क बजावला पाहिजे.हे  या राष्ट्रीय मतदार  दिवसाने  अधोरेखित केलेले आहे. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येत असतो.या निमित्ताने  जिल्ह्यात  विविध स्पर्धा, जनजागृतीचे  कार्यक्रम ही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केले  गेले.गांव,तालुका व जिल्हास्तरावरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काही उद्दिष्ट समोर ठेवली आहेत. एकूण  लोकसंख्येमधील मतदारांचे प्रमाण व 18 वर्षावरील मतदारांची संख्या ही समान असावी यासाठी उपक्रम राबवून ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असते. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण का कमी आहे याची कारणे शोधून त्यामध्ये लक्ष घालून आयोगाने मतदारांची संख्या वाढवली आहे,यात शंकाच नाही.भारत निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक   जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले  होते. कार्यक्रमाची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. भारत निवडणूक आयोगाने आर्थिक अनुदानही या कार्यक्रमाकरीता दिले आहे.एकूण लोकसंख्येमधील महिलांचे प्रमाण आणि मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे.हे प्रमाण वाढविण्यासाठी महिला बचत गट,अंगणवाडी केंद्र, दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच महिलांच्या सामाजिक संघटना, नागरी संस्था यांच्यासोबत चर्चा, परिसंवाद, मेळावे आयोजित करण्यात यावेत. सणासुदीच्या काळात रांगोळी स्पर्धा, खाद्य महोत्सव इत्यादींच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करावी. 18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण सध्याच्या 35 ते 40 टक्कयांवरुन 80 टक्के इतके व्हावे. युवक मतदारांची नोंदणी वाढविण्याकरीता विद्यापिठे, महाविद्यालये आणि त्यांचे युवक प्रतिनिधी यांचेशी संवाद साधण्यात यावा. सर्व विद्यापिठाचे कुलसचिव यांना या प्रयोजनासाठी कॅम्पस ऍ़म्बसडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले  होते. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रार्चायाना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. याशिवाय युवक महोत्सव,विविध क्रीडा स्पर्धा,सायकल रॅली, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, एकांकिका आदी उपक्रमाच्या  माध्यमातून मतदार नोंदणीचे महत्व  युवकांना पटवून देण्यात आले.असे कार्यक्रम आयोजित करताना एन.एस. एस., एन.सी.सी.,नेहरु युवा केंद्र इत्यादी संस्थाचे सहकार्य घेणे उपयुक्त ठरले आहे.

 

शहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे, शहरी क्षेत्रामध्ये उदासिनतेमुळे मतदानाचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शहरी क्षेत्रात मतदान कमी होण्याची नेमकी कारणे शोधून काढून त्यासंबंधी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यासाठीही आयोग आणि जिल्हा प्रशासन या यंत्रणांनी प्रामाणिक काम केले आहें.  त्यासाठी शहरी भागात दूरदर्शन, सिनेमागृहे, केबल टिव्ही इत्याादींच्या माध्यमातून जनजागृती केली गेली.  वेबसाईट व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये जनजागृती करण्यात आली.   निवडणुकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येमध्ये आजही अशिक्षित समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा मतदारांना निवडणूकीच्या कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगून लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.त्यासाठी लोक शिक्षण/प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे. या शिवाय  सामाजिक चालीरीती, रुढी परंपरा यामुळे मतदानाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधून या चालीरीती, परंपरा यातील दोष/उणीवा दूर करण्यासाठी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. याशिवाय गरीब जनतेला आर्थिक मोह दाखवून मतदानाला प्रवृत्त केले जात आहे ,असेही दिसून आले आहे. यास्तव  शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे प्रामुख्याने गरजेचे आहे. आगामी  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये  मतदानाचे सरासरी प्रमाण 65 टक्के असावे असे उद्दिष्ट भारत निवडणूक आयोगाने ठेवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र  राज्यामध्ये  सरासरी 50.48 टक्के इतके तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये  महाराष्ट्र  राज्यामध्ये सरासरी 59.50 टक्के इतके मतदान झाले होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ही टक्केवारी 65 टक्के इतकी असणे आवश्यक आहे. विशेष जनजागृती करुन लोकांना लोकशाहीचे महत्व  पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे ,अशा 10 टक्के मतदान केंद्राचा शोध घेऊन त्यामागची कारणे शोधून योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सर्व जिल्हा प्रशासनाला आयोगाने यापूर्वीच कळविले आहे. टपाली मतदानाचे प्रमाण गेल्या लोकसभा निवडणूकीपेक्षा किमान 10 पटीने वाढावे अशी अपेक्षा आहे.

 

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये जेवढे टपाली मतदान झाले होते. त्यामध्ये 10 पट वाढ करावयाची आहे. त्यासाठी सेनादलातील कर्मचारी, शासन सेवेतील कर्मचारी आणि विदेशी कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी अशा नागरीकांनी टपाली मतदान करणे अपेक्षित आहे. साधारण: शासन  सेवेतील जे कर्मचारी निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाकरीता नेमले जातात किंवा नेमले जाण्याची शक्यता असते अशा कर्मचार्‍यांचा शोध घेऊन त्यांना आगाऊ कल्पना देणे आणि त्यांची कागदपत्रे  जमा करुन घेवून त्यांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास हे प्रमाण वाढू शकेल. भारत निवडणूक आयोगाने याबद्दलची सविस्तर कार्यपध्दती विशद केली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणात निवडणूका पार पडणे अत्यंत महत्वाचे  व आवश्यक आहे. भारतीय लोकशाहीला उज्वल परंपरा आहे.सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे  सहभागी होवून मतदान करावे व टक्केवारी वाढवावी.राजकीय नेत्यांनी,पदाधिकार्‍यांनी व संघटनांनी मतदारांना मतदानास प्रवृत्त केले पाहिजे तरच  भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख होईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!