सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अश्वारूढ शिवशिल्प व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींची मागणी होती. त्यानुसार सांगोला नगरपरिषदेच्या सहकार्याने व आर्किटेक्ट संकेत शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक वारसा जपणारे शिवशिल्प उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कलासंचलनालय विभागाचे मार्गदर्शनानुसार सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 11 फुट उंचीचा 2.5 टन वजनाचा ब्राँझ धातूूचा पुर्णाकृती शिवशिल्प कोल्हापूर येथील शिल्पकार संताजी चौगले यांनी साकारले आहे.
सर्व शासकीय परवानगी मिळालेमुळे गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आश्वारुढ शिवशिल्प कोल्हापूर ते सांगोला असा जल्लोषपूर्ण वातावरणात येणार असून तालुक्यातील हजारो शिवभक्त आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सामील होणार आहेत. दरम्यान सांगोला तालुक्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर जुनोनी, हातीद, पाचेगाव खुर्द, कारंडेवाडी, नाझरा मठ आदी ठिकाणी शिवशिल्पाचे भव्य दिव्य असे स्वागत होणार आहे.
शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सांगोला शहरातील श्री.अंबिका मंदिर येथून ढोल पथक, लेझीम पथक, टाळ पथक, उंट, घोडे, मावळे यांचा समावेश असणारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी सांगोला शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर भगवे झेंडे, स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. तसेच प्रमुख मार्गावरुन रांगोळ्यांची आरास काढण्यात येणार असून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
सांगोला शहरातील भीमनगर, वाढेेगाव नाका, कडलास नाका, वासुद चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व समाजबांधवांकडून शिवशिल्पाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. मिरवणुकीमध्ये शिवप्रेमी नागरिक सेवा देणार आहेत. हे शिवशिल्प व शिवतिर्थ साकार होत असताना जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन, पत्रकार बांधवांचे सहकार्य तसेच बहुजन समाजातील अनेक समाज बांधव, सामाजिक संघटना यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले आहे. या सर्वांच्या ऋणातून शिवप्रेमी मंडळ कधीही उतराई होऊ शकत नाही.शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर काही दिवसांमध्येच भव्य शिवतीर्थ लोकार्पण सोहळा होणार असल्याचे शिवप्रेमी मंडळ सांगोला यांच्याकडून सांगण्यात आले.