“ते माझ्या मतदारसंघात येत असतील तर…” उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यावरून शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सांगोला मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.
मागील तीन महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत सौम्य भूमिका घेणारे शिंदे गटातील नेते आता आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत बंडखोर आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांचा दौरा केला आहे. यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सांगोला मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरून सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असं विधान शहाजीबापू पाटलांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या पुढील महिन्यातील सांगोला दौऱ्याबाबत विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यापूर्वी दोनवेळा माझ्या मतदारसंघात आले आहेत. आताही ते माझ्या मतदारसंघात येत असतील तर त्याबाबत नाराज होण्याचं काहीही कारण नाही. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्यांचा दौरा लवकरच निश्चित होईल.
उद्धव ठाकरेंनी सांगोला दौरा केल्यास मतदारसंघात काही फरक पडेल का? असं विचारलं असता शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, “माझ्या मतदारसंघात अहंकार आणि गर्व नाही. पण माझ्या मतदारसंघात कुणाच्या येण्याने काहीही फरक पडणार नाही. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आणि माझ्यात विभागला आहे. येथील घरांघरात आमची नाती, आमच्या भाव-भावना, आमची सुखं-दु:खं जनतेशी एकवटली आहेत. या मतदारसंघाची परंपरा पुन्हा एकदा देशमुख घराणं विरुद्ध शहाजीबापू पाटील अशीच कायम राहील, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.