संजय राऊत यांनी माझा कट्टयावर बंडखोर आमदार लवकरच परत येतील असं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली आहे. आम्ही सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं. तसेच शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी भाजपसोबत जाण्याचं पाऊल उचलल्याचेही पाटील यांनी सांगितलं.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
शिंदे साहेबांचं नेतृत्व मानलेले आम्ही सगळेजण एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिंदेंच्या सोबतच उभे राहणार आहोत. संजय राऊत आज जे बोलले आहेत, तो विचार त्यांनी आम्हाला शिकवण्यापेक्षा अडीच वर्षापूर्वी तुम्ही निवडणूक झाल्या झाल्या तेव्हा आम्हाला फरफडत नेहून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा चुराडा केला. जनावरं जशी दावणीला बांधली जातात तसे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधले. या पापाचं पहिलं प्रायश्चित्त घ्या आणि त्याच कारणासाठी आपण मूळ शिवसेनेच्या विचारापासून फारकत होत चालेली आहे. आपण दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत, ज्यांनी अनेकदा बाळासाहेब ठाकरेंचा घात केला, त्यांच्यासोबत चाललो आहोत. टप्प्या टप्प्यानं मित्रपक्षचं शिवसेना गिळायला लागली आहे. मंत्रालयाचा आणि मंत्रालयातून दिला जाणाऱ्या निधीचा शिवसेनेचा प्रत्येक आमदार येणाऱ्या निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, असे डावपेच सुरु झाले होते. दुर्दैवानं संजय राऊत अथवा उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं नाही. त्यासाठी आम्ही सर्व आमदारांनी एकजुटीनं एकनाथ शिंदे यांना हे पाऊल उचलायला भाग पाडले आहे. हे एका दिवसात घडलेलं नाही. दोन वर्ष दु:ख सहन करत करत नाईलाजानं शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं.