गुवाहाटीला जाण्यासाठी ‘खोके’ घेतल्याच्या रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, “राणाचे आरोप मुख्यमंत्र्यांसह…”
आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांचा समाचार घेतला.
आपल्याला आयुष्यात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. गेल्या २० वर्षांपासून मी मेहनत करत कोणत्याही पक्षाशिवाय, झेंड्याशिवाय, पैसे खर्च न करता चार वेळा आमदार झालो. त्यामुळे राणांकडून जे खालच्या स्तरावर आरोप करणं हे मनाला दुखवणारे आहेत. राणांनी जे आरोप केले आहेत, ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही नाही. ते कोणाच्या जीवावर बोलत आहे, हे तपासणे गरजेचे आहे. राणांनी केलेले आरोप एकट्या बच्चू कडूवर नाही, तर त्यामुळे ५० आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहटीला नेले, असा त्याचा अर्थ होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
येत्या काही दिवसांत एक व्हिडिओ माझ्याकडे येणार आहे. एका खासगी बैठकीतला हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत बच्चू कडूला कशा प्रकारे बदनाम करायचं, बच्चू कडूला कशाप्रकारे अडचणीत आणायचं, याचे प्रयत्न सुरू आहेत. हा व्हिडिओ लवकरच माझ्याकडे येणार आहे. त्यानंतर मी मुद्यावर सविस्तर माहिती देईन”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, “राणांच्या आरोपानंतर आम्ही त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. कोणावर आरोप करताना पुरावे असेपर्यंत बोलून नये, असा साधारण नियम आहे. याबाबतीत आम्ही न्यायालयात जाणार असून तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवणार” असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तसेच “एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार जाईल, हे निश्चित होतं. त्यामुळे येत्या काळात दिव्यांगांची, शेतकऱ्यांची किंवा इतर मतदारसंघातली कामं व्हावी, या उद्देशाने मी गुवाहाटी जाण्याचा निर्णय घेतला होता”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
https://chat.whatsapp.com/HWDvOIAzp5s6CaOO9kWOux