सांगोला तालुकाक्राईम

जुनोनी येथे दिंडीतील वारकर्‍यांवर काळाचा घाला

पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने 7 वारकर्‍यांचा मृत्यू

सांगोला (प्रतिनिधी):- कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकर्‍यांवर काळाने घाला घातलाय. दिंडीत भरधाव कार घुसल्याने सात वारकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे पाठीमागून कार घुसली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात सात वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा वारकरी जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली आणि वारकर्‍यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात सात वारकर्‍यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ही दिंडी होती. जुनोनी गावाजवळील श्रीराम वस्ती येथे या दिंडीचा मुक्काम होता. जिथे अपघात झाला तेथून ही वस्ती दोन किमी अंतरावर आहे. विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत कार घुसली आणि समोर आलेल्या प्रत्येकाला चिरडत पुढे गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पायथ्याशी असणार्‍या जठारवाडी गावातील या दिंडीमध्ये 32 वारकरी होते. यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

या अपघातात जखमी झालेल्या पाच वारकर्‍यांवर सांगोला येथे उपचार सुरु आहेत. सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी संपर्क करून वारकर्‍यांना दिलासा दिला. ग्रामीण रुग्णालयात पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, गोपाळ पवार यांनी भेट घेऊन जखमी वारकर्‍यांची चौकशी केली.

मृत वारकर्‍यांची नावे– शारदा घोडके, गौरव पवार, सर्जेराव जाधव, सुशीला पवार, रंजना जाधव, सुनिता काटे, शांताबाई जाधव. हे सर्वजण राहणार करवीर तालुक्यातील आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

दरम्यान, मृत वारकर्‍यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आणि या घटनेतील जखमी वारकर्‍यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!