तोडफोड करा आणि बाहेर पडा, कार्यकर्त्यांच्या भावना, मुख्यमंत्र्यांनी माझी बदनामी भरुन द्यावी : बच्चू कडू
रवी राणांसोबतच्या वादावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातल्या वाद आज निकाली निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी दोघांनाही आज मुंबईला बोलावून घेऊन त्यांना समज देणार आहेत. दोघांचंही म्हणणं ऐकून शिंदे-फडणवीस वादावर तोडगा काढतील. तत्पूर्वी माझ्या कार्यकर्त्यांची भावना अतिशय तीव्र असून तोडफोड करुन बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केलाय. रवी राणा अतिशय नीच पद्धतीने माझ्यावर बोलला आहे. नीच आरोप करुन माझी बदनामी केलीये. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर एवढंच सांगेन माझी बदनामी भरुन द्या, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी ‘खोके’ घेतल्याचा आरोप करुन रवी राणा यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर गेली चार दिवस बच्चू कडू-रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या कलगीतुऱ्याने आता वादाचं शेवटचं टोक गाठलं आहे. त्यामुळे दोघांच्या वादात सरकारची बदनामी नको म्हणून शिंदे-फडणवीसांनी त्यांना दोघांनाही भेटीला बोलावलं आहे. आज रात्री ही भेट होण्याची शक्यता आहे, ज्यानंतर दोघांमधला वाद निकाली निघण्याची आशा आहे.

बच्चू कडू म्हणाले, “रवी राणाने माझ्यावर अत्यंत नीच आरोप केले आहेत. त्याच्याविषयी माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र भावना आहेत. मी तोडफोड करुन बाहेर पडावं, अशी इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे. रवी राणाबरोबर आज बैठक करण्याची माझी इच्छा नाहीये. पण मुख्यमंत्री काय बोलतात, ते बघू… माझी त्यांच्याकडून कुठलीच आशा नाहीये. फक्त माझी झालेली बदनामी त्यांनी भरुन द्यावी”
मी एक तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. जर माझं समाधान झालं नाही तर मी निर्णय घेईन. १ तारखेच्या अल्टीमेटममध्ये कोणताही फेरबदल नाही. मी जे बोललो ते बोललो.. जर आज समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर रात्री कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेईन”, असंही बच्चू कडू म्हणाले.