*मला गुवाहाटीला जायचं नव्हतं, पण…. बच्चू कडूंनी सांगितलं नेमकं काय घडलं?*
आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. सध्या रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या सगळ्यामुळे बच्चू कडू यांनी वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे वक्तव्य राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. अलीकडेच बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणासाठी केलेले आंदोलन अयोग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपुलकी असल्याचे वक्तव्य केले आहे. पण उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके ते ‘वर्षा’वर दिसत नव्हते, असेही बच्चू कडू यांनी म्हटले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले.
या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी आपल्याला गुवाहाटीला जायचेच नव्हते, असा गौप्यस्फोटही केला. शिवसेनेविरुद्धच्या बंडानंतर एकनाथ शिंदे गटाचे आमदार सूरतला गेले होते. यामध्ये बच्चू कडू यांचाही समावेश होता. बंडखोर आमदारांनी आपला मुक्काम सुरतमधून गुवाहाटीला हलवला होता. यामध्ये तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही समावेश होता. परंतु, मला गुवाहाटीला जायचे नव्हते, असा खुलासा बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केला..
आमच्या पक्षाचे राजकुमार पटेल हे सर्वप्रथम गुवाहाटीला गेले होते. नंतर मी गुवाहाटीला गेलो. त्यांच्याशी बोलून मी परत येणार, असे ठरले होते. मी शिंदे गटासोबत आहे, एवढं सांगून मला परत याचंच होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. राजकारणात ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. मात्र, बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
बच्चू कडूंची राणांवर टीका
बच्चू कडू यांनी शनिवारी यवतामळमधील कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. धर्म हा कधीच धोक्यात नसतो, नेता धोक्यात असतो. राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा आंदोलन म्हणजे फुकटच्या प्रसिद्धीचा बुडबुडा होता. त्यांनाही हनुमान चालिसाही म्हणता येत नाही आणि ते आंदोलन करायला निघाले. रवी राणा हे वाढदिवसाच्या बॅनर्सवर अमिताभ बच्चनच्या स्टाईलध्ये फोटो टाकतात, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. बच्चू कडू हे रविवारी दुपारी मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता आहे. ते संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील, असे सांगितले जात आहे.