महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.दहावी पालक-शिक्षक सभा संपन्न
संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांचे श्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यातून पालक-शिक्षक-विद्यार्थी यांचा मजबूत त्रिकोण तयार झाला असून पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती पूर्णपणे घालवावी, विद्यार्थ्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेस सामोरे जावे असे निवेदन सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद यांनी इयत्ता दहावी पालक-शिक्षक सभेच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, महेश कोरे, सागर सरगर उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.सय्यद यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित असून अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही सांगितले.
प्रास्ताविकामधून पर्यवेक्षक सुरेश मस्तूद यांनी पूर्व परीक्षेच्या निकालाचे वाचन करत आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेस सामोरे जाताना त्यांच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास शिक्षकांकडून वेळीच निरसन करण्याबद्दल आवाहन केले.
शिक्षक मार्गदर्शनातून सौ.शुभांगी घोंगडे यांनी विद्यार्थ्यांची सलग बैठक आणि एकाग्रता वाढण्यासाठी पालकांनी लक्ष द्यावे तसेच सकस आहार व पुरेशी झोप आणि अभ्यासाचे योग्य नियोजन यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याविषयी सूचना केली.
सी.ई.टी., जे.ई.ई., नीट या स्पर्धांचे मार्गदर्शन मेरीट होमचे प्रा. महेश कोरे यांनी करताना मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे विविध कोर्सेस, ब्रिज कोर्स यांची माहिती सांगितली.
पालक मनोगतातून सौ.घाडगे परीक्षेची तयारी करताना शिक्षक व शाळा यांनी नियोजनबद्ध केलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवाद देत काही सूचना मांडल्या.सभेचे सूत्रसंचालन सौ.शैलजा झपके यांनी तर आभार गणेश हुंडेकरी यांनी मानले. संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर व संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सभा यशस्वीपणे पार पडली. सभेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.