महाराष्ट्र
आपुलकी प्रतिष्ठान कडून पासवान कुटुंबियांना २६ हजार ४६५ रुपयांची आर्थिक मदत
सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांच्याकडून मयत आदित्य पासवान यांच्या कुटुंबियांना २६ हजार ४६५ रुपयांची आर्थिक मदत मंगळवारी करण्यात आली.
मूळचे बिहार येथील आदित्य पासवान व त्यांचे कुटुंब गेल्या १५ वर्षाखाली उदरनिर्वाहासाठी सांगोला शहरात आले आहे. आदित्य पासवान हे पेंटरचे काम करत होते. त्यांना रविवारी छातीत दुखण्याचा त्रास झाला व हृदयविकाराच्या धक्क्याने सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. पासवान यांच्या पार्थिवावर रविवारी सांगोला येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्ता पुरुष अचानक मृत्यू पावल्यामुळे पासवान कुटुंबीय मोठ्या संकटात सापडले. पासवान यांच्या पश्चात पत्नी व ९ वीत शिकणारी दोन मुले आहेत. पासवान यांचे इतर विधी गावी (बिहार) करायचे असल्यामुळे व परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे गावी जाण्यासाठीही त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याचे भेटीअंती आपुलकी प्रतिष्ठान सदस्यांच्या निदर्शनास आले. पासवान कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने आपुलकी प्रतिष्ठानच्या ग्रुपवर आवाहन केल्यानंतर सदस्यांनी या कुटुंबाबद्दल आपुलकी दाखवत ४ तासात २६ हजार ४६५ रुपये जमा करून ते मंगळवारी पासवान कुटुंबीयांना दिले. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अरविंद डोंबे, श्रीकांत हसबनीस, रमेश गोडसे, अच्युत फुले, दिपक शिनगारे, दादा खडतरे, प्रमोद दौंडे, संजय गोडसे आदी उपस्थित होते.
पासवान कुटुंबियांना आणखीही आर्थिक मदतीची गरज असून ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी श्रीमती रेणुका आदित्य पासवान (फोन पे नंबर 9503862571) वर मदत करून या गरीब कुटुंबाला या ओढावलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले आहे.