महाराष्ट्र

*चिमुकलीच्या वेदनेला हरवणारी गावकऱ्यांची “आपुलकी”*

नाझरा( प्रतिनिधी) सुनील जवंजाळ  :-
*”जगण्याला जिंकूच आम्ही वेदनेला हरवू,*
*चिमुकलीचे स्मित हास्य काळजात मिरवू”*
चोपडी गावातील आप्पासाहेब केंगार.. दररोज सकाळी उठायचं गावातल्या तुकोबाच्या मंदिरावर नतमस्तक व्हायचं आणि गावच्या सफाईला सुरुवात करायची.. ग्रामपंचायतीमध्ये रोजंदारीने सफाईचे काम करणारे आप्पासाहेब केंगार उर्फ आप्पा बुवा यांची इयत्ता नववीत शिकणारी मुलगी तेजस्विनी… सोमवारी 27 जानेवारी रोजी दुपारी शाळेत खेळताना अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या तातडीने तिला उपचारासाठी गावातील त्याचबरोबर सांगोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सांगोल्यातील डॉक्टरांनी तिला सांगलीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
असह्य वेदनेनं विव्हळणाऱ्या आपल्या चिमुकलीला मंडी वरती घेऊन त्यांनी तात्काळ सांगली गाठली. तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू करण्यात आले मात्र विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचणीनंतर असे लक्षात आले की तिच्या स्वादुपिंडाचा आजार बळवला आहे.सांगलीतील डॉक्टरांनी त्यांना पुणे येथील केएमई रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. आपल्या लेकराच्या नशिबात हे काय वाढून ठेवले आहे या विचाराने आप्पा बुवा पुरते हादरून गेले. तिला तात्काळ पुणे येथील के एम ई रुग्णालयात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांच्या वैद्यकीय निदानानुसार तिच्या स्वादुपिंडावर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासाठी तीन-चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कोणत्याच शासकीय योजनेत ही शस्त्रक्रिया बसत नसल्याने त्यांचे अवसान गळून गेले. आप्पा बुवा हे ग्रामपंचायत मध्ये रोजंदारीने सफाई कामगार म्हणून काम करत छोटे-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.गावात कुठेही धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी अगदी सफाई पासून ते कीर्तनात चोपदार म्हणून उभारण्यापर्यंत त्यांची भूमिका सर्वांना परिचित आहे.अगदी हसतमुख असणारा व्यक्तिमत्व हातबल झाले होते परंतु गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर व इतर सर्वांच्या सहकार्यातून चिमुकलीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आणि या आव्हानाला प्रतिसाद देत कालपर्यंत जवळपास दोन लाख रुपये गावकऱ्यांनी जमा केले. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी, गलाई बांधवांनी त्याचबरोबर गावातील अगदी छोट्या व्यावसायिकांनीही आर्थिक मदत करून आप्पा बुवा यांना आधार दिला. काल सकाळी के एमई रुग्णालयातील डॉक्टरांकडून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. काही दिवसातच ती बरी होऊन चोपडीत येईल..
चोपडीकरांनी दाखवलेल्या आपुलकीच्या सहकार्याने चिमुकलीच्या चेहऱ्यावरचे हास्य परत खुलणार आहे. तेजस्विनी च्या चेहऱ्यावरचे तेज पुन्हा खुलणार आहे.. खरतर चोपडीकरांनी दाखवलेल्या या दातृत्वामुळे चिमुकलीच्या वेदनेला हरवण्याची किमया साकार झाली आहे. चोपडीकरांनी यापूर्वीही अनेकदा अशा कठीण प्रसंगात सापडलेल्या कुटुंबाला व्यक्तींना आर्थिक मदत करून जगण्याची उभारी दिली आहे. कोरोना सारख्या काळात असंख्य गोरगरिबांना धान्याचे कीट वाटप करून आपुलकीचे हात अनेकांच्या खांद्यावरती ठेवले आहेत.
ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या या आप्पाबुवाला अजूनही आर्थिक मदतीची गरज आहे या माध्यमातून आपणास आवाहन करण्यात येत आहे की आप्पा बुवा यांचे बंधू तुकाराम केंगार फोन पे.9527338543 या क्रमांकावरती आपण आर्थिक मदत करू शकता. आपली आर्थिक मदत चिमुकलीला उभारी चे बळ देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button