महाराष्ट्र
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.
येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2024 मध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 03/02/2025 रोजी संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक श्री. आप्पासाहेब खोत होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांनी भूषविले.
संस्थेचे सचिव श्री. अंकुशराव गायकवाड, विश्वस्त सौ. जयमालाताई गायकवाड, डॉ. यशोदीप गायकवाड, पालक प्रतिनिधी श्री. तानाजीकाका पाटील यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री. आप्पासाहेब खोत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी हिवाळी परीक्षा 2024 च्या निकालाचे वाचन केले.
यावेळी शैक्षणिक, कला व क्रीडा विभागात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिवाळी परीक्षा 2024 मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या एकूण 47 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या सर्व शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या अभय गायकवाड, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या प्रांजली इंगवले आणि तृतीय क्रमांक पटकाविलेले स्वप्नाली पाटील हे विद्यार्थी आहेत. द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या सर्व शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या आशुतोष कोडग, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या शुभम माने तसेच तृतीय क्रमांक मिळवलेले स्वप्नाली शिंदेहे विद्यार्थी आहेत.
तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या सर्व शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या अमृता मिसाळ, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या मृदुला पाटील व गायत्री मिसाळ विभागून, तसेच तृतीय क्रमांक मिळवलेले तनुजा मोरे हे विद्यार्थी आहेत. वरील सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 5000 , 3000 व 2000 हजार रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर तीन वर्षातील 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले एकूण 47 विद्यार्थ्यांना रोख रुपये 1000 देऊन गौरवण्यात आले. विविध विषयात 100 पैकी 100 गुण मिळणाऱ्या एकूण 7 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त यांच्या हस्ते रुपये 1000 रोख व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी आयोजित केलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांच्या व मुलींच्या कबड्डी संघाने विजेतेपद प्राप्त केले, तसेच मुलांच्या व मुलींच्या संघाने बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात उपविजेतेपद मिळविले असून , वेटलिफ्टिंग या वैयक्तिक क्रीडा प्रकारातील उपविजेतेपद पटकाविले तसेच कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकाविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेज स्तरावर आयोजित केलेल्या ‘कुरुक्षेत्र’ व ‘स्पंदन’ या क्रीडा व कला महोत्सवातील विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. आप्पासाहेब खोत यांनी विद्यार्थ्यांना तीन वर्ष जीव ओतून प्रामाणिक कष्ट केल्यास त्यांची उर्वरित आयुष्य सुखकर होईल असे मत व्यक्त केले. बाबुराव गायकवाड यांनी कॉलेजच्या माध्यमातून अनेक तरुणांना तंत्रशिक्षणाची दारे खुली करून देऊन त्यांना रोजगारक्षम बनविले असल्याचे गौरवउद्गार यावेळी त्यांनी काढले. विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी टांग्याच्या घोड्यासारखे एकाग्र होऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी असे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यांना ‘गॅदरिंगचा पाहुणा’ ही भन्नाट विनोदी कथा सांगून त्यांचे निखळ मनोरंजन केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.जयमालाताई गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कष्ट व चिकाटीच्या जोरावर ध्येय साध्य करावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश उल्लेखनीय असून त्यांनी संस्थेची असलेली यशाची उज्वल परंपरा पुढे नेण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी हिवाळी परीक्षा 2024 मधे मिळालेले यश हे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सामूहिक प्रयत्नाचे फलित असून येणाऱ्या काळात ही विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले. हिवाळी परीक्षेमधील हा निकाल कॉलेजच्या व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा, शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा याचे फलित आहे असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.एस.डी.बावचे यांनी केले.