माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान मार्फत बचतगटामध्ये हळदीकुंकू कार्यक्रम
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान मार्फत सन १९९५ पासून सांगोला तालुक्यातील गावांमध्ये संस्थेचे बचतगट
सुरु आहेत. सध्या तालुक्यात वाढेगाव, मेडशिंगी, संगेवाडी, कमलापूर, सोनंद, लोणविरे, तीप्पेहाळी, अकोला,
सावे, देवळे, एखतपूर अशा लहान लहान गावामध्ये महिलांचे एकूण ११८ स्वयं सहाय्यता बचतगट सुरु आहेत.
महिला सक्षमीकरण याबाबत जागरूक असलेल्या या संस्थेने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे त्याच
बरोबर तिच्या कुटुंबाचा विकास या उद्देशाने सुरु केलेले बचतगट आता खरोखरीच परिपूर्ण होत आहे. संस्थेने
वेळोवेळी गटातील महिलांसाठी उद्योग प्रशिक्षणे दिली. त्यामुळे बऱ्याच महिलांनी आपला स्वतःचा लघु उद्योग
सुरु केलेला आहे.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत सुरु झालेल्या ‘आरोग्य विषयक मोफत शस्त्रक्रिया योजना’ याअंतर्गत
देवळे येथील एका महिलेची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्या महिलेने संस्थेची माहिती
घेवून आपल्या गावातील महिलांचेही भले व्हावे या उद्देशाने एक बचतगट सुरु केला. तिचे बघून इतर
महिलांनीही त्यामध्ये सहभाग घेवून २० -२० महिलांचे बचतगट सुरु केले. सध्या तेथे संस्थेचे एकूण ७ बचतगट
सुरु आहेत. एकूण १३३ महिला बचतगटाच्या सभासद आहेत. ‘संक्रांतीचे’ औचीत्य साधून शनिवार दि. १
फेब्रुवारी २०२५ रोजी देवळे येथील महिलांचा छोटा मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. संत
रामदासांच्या फोटोचे पूजन करून संस्थेच्या CEO सौ. अश्विनी कुलकर्णी यांनी महिलांना प्रोत्साहित करणारे
गाणे घेवून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी संस्थेच्या संस्थापक व उपाध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर व
अध्यक्षा प्रा. निलिमा कुलकर्णी यांनी महिलांना स्वतःचे आरोग्य कसे जपावे, त्याचबरोबर आपल्याला
मिळणाऱ्या कमाईतून बचत करून कुटुंबाचा विकास करावा, एकमेकींशी संवाद कसा असावा, सासू सून नाते
संबंध कसे असावेत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संस्थेत सुरु असणाऱ्या ‘उत्कर्ष कौशल्य विकसन केंद्रात’ सुरु
असणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती सांगून त्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. काही महिलांनी
गाणी म्हणून महिलांचे मनोरंजन केले.
रेश्मा बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
शेवटी महिलांना तिळगुळ व भेट म्हणून साडी देण्यात आली. महिलांना भेट स्वरुपात साडी मिळाल्याने
त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. महिलांना देण्यात आलेल्या साड्या या संस्थेच्या कार्यकर्त्या सौ मंगल कुलकर्णी
यांच्या मातोश्री रोपळे येथील सौ. सुमन सुधाकर कुलकर्णी, सांगोला तेथील कैवल्य साडी सेंटरचे मालक श्री
प्रशांत गव्हाणे साहेब तसेच वाटंबरे येथील अभिषेक साडी सेंटरचे मालक श्री दत्तात्रय गव्हाणे साहेब व
संस्थेच्या सचिव सौ. वसुंधरा कुलकर्णी यांनी देणगी स्वरुपात दिल्या. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ.
निलिमा कुलकर्णी, उपाध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, सौ अश्विनी कुलकर्णी, सौ संपदा दौंडे, सौ संगीता खडतरे
तसेच देवळे गावातील महिला व बचतगट सदस्या उपस्थित होत्या.