महाराष्ट्र
जि.प.प्रा.शाळा महुदच्या विद्यार्थ्यांनी भरवला आनंदी बाजार .
मंगळवार दिनांक ४/०२/२०२५ रोजी जि.प.प्रा.शाळा महुदच्या विद्यार्थ्यांनी आनंदी बाजार भरवला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील लक्ष्मण जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन होऊन खरेदी विक्रीस सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी बाजारात भाजीपाला ,पालेभाज्या,खाऊचे वेगवेगळे पदार्थ, खेळणी असे विविध स्टॉल लावले होते.
दही-धपाटे,मटकीची उसळ,माडगे असे वैविध्यपूर्ण स्टॉल ही लावण्यात आले होते.रानातील हुरडा,मक्याची कणसे,गाजरे,रताळी अशा रानमेव्याचीही मुले विक्री करताना दिसली.संरक्षक भिंतीच्या आत असलेल्या झाडांच्या सावलीखाली मुलांनी हा आनंदी बाजार भरवला होता.भाजी घ्या भाजी,ताजी ताजी भाजी, आता नाही तर कधीच नाही,भेळ घ्या भेळ-ओली सुकी भेळ असा पुकारा करत विद्यार्थी गिर्हाईकांचे लक्ष वेधत होते.खरेदीसाठी पालक,शिक्षक यांची झुंबड उडाली होती.
दुपारचा चहा दुपारचा चहा म्हणत एक मुलगा चहाही विकताना दिसला.उन्हामध्ये गिर्हाईकांच्या घशाला गारवा मिळावा म्हणून कुल्फी, फ्रुट सॅलड व सरबताचाही स्टॉल लावला होता.पुरुषांबरोबरच महिलांचीही खरेदीसाठी मोठी गर्दी होती.मुलांना खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्ञान समजावे,गणिती क्रियांचा व्यवहारात वापर करता यावा तसेच यश आणि अपयश पचवायला शिकावे,नफा तोटा समजावा यासाठी या बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.सदरच्या बाजारामध्ये ५२००० रुपयांची उलाढाल झाली.झालेला नफा पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.