सर्व पर्यटनस्थळे पुढील 5 दिवसांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
पुण्यात पावसामुळे हाहाकार उडाला असून मुळशी आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनेस्थळांना पुढील 5 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत आदेश दिला असून या दोन्ही तालुक्यात धरण व नदी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून धरणपरिसरासह या सर्व ठिकाणी फिरता बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २९ तारखेपर्यंत सकाळी ८ पर्यंत ही पर्यटनस्थळे बंद राहणार आहेत.
पुण्यात रात्रभर झालेल्या पावसाने घरांत पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे. नद्या, ओढे यांचा प्रवाह वाढल्याने धबधब्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. परिणामी, मावळ आणि मुळशी तालुक्यात आजपासून पुढील पाच दिवस पर्यटन बंद राहणार असल्याच्या प्रशासकीय सूचना आहेत.
जीवितहानी होण्याची भीती
पुण्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यात सध्या अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील पर्यटनस्थळे, धरणे आणि सभोवतालचा परिसर, नदीपात्र धोकादायक स्थिती आले आहे. त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने सर्व गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील धोकादायक ठिकाणी प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
गर्दीच्या सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास प्रतिबंध
मावळ आणि मुळशी भागात सध्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असून काल रात्रीपासून झालेल्या पावसाने मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व गर्दीची पर्यटनस्थेळांवर जाण्यास आजपासून २९ जुलैपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे. गर्दीच्या सर्व पर्यटनस्थळांसह धरणपरिसरात तसेच नदीपात्राजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धोक्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील अतिवृष्टीमुळे मुळशी आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे धोक्यात आली असून आजपासून २९ तारखेपर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. मावळ व मुळशी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी हा निर्णय दिलाय. यावेळी पोलिसांसह वन विभाग आणि ग्रामपंचायतीला या आदेशावर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून या सर्व ठिकाणी फरता बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.