महाराष्ट्र

तालुक्यातील सुरू असलेला वाळू उपसा बंद करा… परंपरागत वाळू वसूलदाराला कोणाचं अभय -दत्तात्रय सावंत

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात सध्या नदीपात्रातून प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उत्खनन केले जात आहे तसेच तालुक्यात बेकायदेशीर व्यवसाय वाढले असून, याकडे प्रशासकीय अधिकार्‍याकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांची व महसूल विभागाच्या अधिकारी यांची भूमिका वाळू माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा असून नदीतून अवैधरित्या दिवसेंदिवस या वाळु उपशाचे प्रमाण वाढत चालले आहे. परंपरागत असणार्‍या वाळू वसुलदारामुळे अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून या वाळू वसुलदारास कोणाचा आशिर्वाद आहे असा संतप्त सवाल उपस्थित करुन अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करुन तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

सांगोला शहरातील खारवटवाडी परिसरासह तालुक्यातील वाटंबरे, नाझरे, कोळा, कडलास, जवळा, सोनंद या भागातून मध्य रात्रीपासून पहाटेपर्यंत डंपर, टेम्पो आदी अवजड वाहनांतून वाळूची वाहतूक होत आहे. या वाहतुकीकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अप्रत्यक्ष आशीर्वाद देत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सांगोला तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून वाहतूक करण्यात येत आहे. बेकायदा वाळू उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत असताना महसूल खात्याचे स्थानिक अधिकारी गप्प का, असा सवालही विचारला जात आहे.

गेल्या काही वर्षात राजरोस वाळू उपसा करण्यात येत होता. तसेच दिवसभर वाळू वाहतूक करण्यात येत असे, मात्र आता वाळू माफियांनी आपले वेळापत्रक बदलून आता पहाटेचा वेळ निवडला आहे. अवजड वाहने आणि वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक करण्यात येत असल्याने वाळू वाहतूक करणार्‍या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाळूने भरलेले डंपर चालक रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अन्य छोट्या वाहनांना बाजू देत नसल्याने मोटारसायकल, जीप आदी छोट्या वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांची व महसूल विभागाच्या अधिकारी यांची भूमिका माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा आहे. अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. वाळू माफिया हे साम, दाम दंडासह लोकांना धमकावून, आर्थिक तोड-पाणी करून गावागावात दहशतीचे वातावरण करत आहेत. गावातील सलोखा बिघडत चालला आहे. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात वाळू माफियांचा उघड वावर असल्याचे लोक खाजगीत बोलत आहेत. अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफीयांना पाठीशी घालणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर देखील कारवाई करण्यात यावी.अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून तालुक्यातील रस्ते खराब होऊ लागले आहेत तसेच सदर वाळू उपसा हा शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिवसरात्र सुरु आहे. लाखो ब्रास वाळू माफिया उचलत असल्यामुळे शासनाचा महसूल (रॉयल्टी) बुडत आहे.

वाळू वाहतूक करणार्‍या अवजड वाहनामुळे रस्त्याची परिस्थितीही धोकादायक बनत चालल्याने वहातुकीस अडथळे निर्माण होणार आहेत. पोलिस आणि संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करावी, अशी मागणीही दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button