अनुसंधान ट्रस्ट-साथी व अस्तित्व संस्थेच्या वतीने सोलापूर येथे संवाद मेळावा संपन्न.

.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या प्रक्रियेत लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी स्थानिक पातळीवरील आरोग्याचे प्रश्न, लोकांना आरोग्य सेवा घेताना येणाऱ्या अडचणी व आरोग्याबाबत महिलांची मते जाणून घेण्यासाठी महिला आरोग्य समित्या ही महत्वाची जागा असून, आरोग्य यंत्रणेसाठी महिला आरोग्य समित्या हा जनतेचा स्टेथोस्कोप आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या समित्या करत आहेत. तसेच महिला आरोग्य समित्या या जनता आणि आरोग्य यंत्रणेतील दुवा आहेत, असे मत साथी संस्थेचे संचालक डॉ. धनंजय काकडे यांनी व्यक्त केले.
सोलापूर महानगरपालिका, अनुसंधान ट्रस्ट – साथी पुणे व सांगोला येथील अस्तित्व संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्य विषयक संवाद मेळाव्याचे आयोजन समाजकल्याण भवन, सोलापूर येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले होते. यासाठी शहरातील 30 महिला आरोग्य समित्यांमधून अध्यक्ष, सचिव व सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरातील वस्ती पातळीवर महिला आरोग्य समित्या 2015 पासून गठीत करण्यात आलेल्या आहे. परंतु बहुतांश ठिकाणी या समित्या कागदोपत्री असल्याचे दिसते. साथी संस्थेमार्फत सोलापूर महानगरपालिके सोबत गेल्या एक वर्षभरात महिला आरोग्य समित्यांची बळकटीकरण आणि समित्यांना सक्रिय करणाची प्रक्रिया चालू आहे. यासाठी विडी घरकुल आणि रामवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महिला आरोग्य समित्यांना सक्रिय करण्याचे काम करण्यात येत आहे.
यावेळी महिला आरोग्य समितीने वस्ती पातळीवर केलेल्या विविध कामांचे सादरीकरण केले. तसेच ‘राष्ट्रीय पातळीवरील निर्णयानुसार आपण महिला आरोग्य समितीमध्ये अध्यक्ष, सदस्य आहोत, हे अभिमान आणि आत्मसन्मानाचे पद आम्ही महिला भूषवित असल्याचेही सांगतात.’ वस्तीतील प्रश्न आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द याने महिला आरोग्य समितीने एकेक पाऊल टाकायला सुरूवात केली आणि कामाचा ठसा उमटू लागला.
या संवाद मेळाव्यासाठी अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, प्रवीण सुर्यगंध यांनी मार्गदर्शन व समन्वय केला.
या संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक शकुंतला भालेराव यांनी केले. तर मागील एक वर्षाच्या कालावधील झालेल्या कामाचे सादरीकरण विनोद शेंडे आणि तब्बू नगारे यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना चव्हाण यांनी केले.
वस्तीतील लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असून अनेक लोक मजुरीची कामे करतात. मात्र सरकारी दवाखान्यात बीपी, डायबेटीसची औषधे मिळत नसल्याने त्यांना महिन्याला ७०० ते १००० रुपये खर्च करावे लागत होते. यासाठी शिंदे-साठेनगर वस्तींच्या महिला आरोग्य समितीने बीपी, डायबेटीसची औषधे त्या भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळण्यासाठी महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देवून त्याचा पाठपुरावा केला होता. आता त्या भागातील रुग्णांना बीपी, डायबेटीसची औषधे मिळत आहेत.
मेघशामनगरमध्ये अंगणवाड्या नसल्याने गरोदर महिला, स्तनदा माता आणि सहा वर्षाखालील बालकांना सेवा मिळत नाहीत. तसेच वस्तीपातळीवर आशा व नर्स यांनाही आरोग्याच्या सेवा देताना अडचणी येतात. आपल्या वस्तीत अंगणवाडी सुरु व्हावी, यासाठी मेघशामनगरच्या महिला आरोग्य समितीने पुढाकार घेवून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे व त्या अंगणवाडी सुरु होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.