पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा अभियान साजरा करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. देशप्रेमाचे वातावरण निर्माण होण्यासाठी, देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
११ ते १४ ऑगस्ट याकाळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान महापुरुषांचे स्मारक, पुतळा परिसर, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
देशभक्तीपर गीत, तिरंगा यात्रा, मेळावे, सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.