अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे ७८ वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य कार्यक्रम शालेय परिसरात आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण मेजर सतीश विभुते यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मेजर लक्ष्मण पवार, बापूराव कोळवले, दत्तात्रय बुधनेर, संदीप कुरे, पांडुरंग लाडे, हणमंत करडे, चंद्रकांत मिसाळ,लक्ष्मण पाटील, जगन लाडे, सुनील येलपले, संदीप करंडे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या महत्त्वावर भाष्य करत, स्वातंत्र्याच्या इतिहासाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात निरनिराळ्या कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींचा गौरव करण्यात आला, तसेच आजचा भारत आणि स्वातंत्र्यपूर्वीचा भारत यातील फरक आणि आजच्या पिढीसमोरील आव्हाने यावर विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
कार्यक्रमात ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या तसेच आंतरशालेय मेहंदी स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या भारताच्या नकाशाची प्रतिकृती या प्रमुख आकर्षणास उपस्थित मान्यवर तसेच पालक वर्गाकडून खूप वाहवा मिळाली.
कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने करण्यात आली. सूत्रसंचालन कावेरी गिड्डे मॅडम यांनी केले, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून भंडगे सर यांनी स्वतंत्र भारत व आजचा भारत यावर त्यांच्या मनोगतातून प्रकाश टाकला.आभारप्रदर्शन वंदना शिंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.