सांगोला (वार्ताहर) दररोज शिकवलेल्या भागाची घरी उजळणी करत दिवसाच्या वेळेचे नियोजन केल्यास यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुखकर व सहज साध्य होतो असा कानमंत्र उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटना वेळी अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी व्यासपीठावर विभाग नियंत्रक पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे, संस्था व प्रशाला बाह्य परीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे व सिताराम राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाला. प्रास्ताविकातून पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांची मार्गदर्शन वर्गातील उपस्थिती व अभ्यासातील सातत्य याचे महत्त्व सांगत सर्वांचे स्वागत केले.
विभाग प्रमुख नागेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना विद्यामंदिरची राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीची परंपरा राखण्यासाठी शिक्षकांच्या सूचनांचा आदर करत परिश्रम करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार विभाग प्रमुख दत्तात्रय पाटील यांनी मानले.
यावेळी वैभव कोठावळे, संध्या तेली, चैतन्य कांबळे, अश्विनी साळुंखे, आशुतोष नष्टे, दिग्विजय चव्हाण, रूपाली देशमुख, धनश्री पाटणे, दत्तात्रय कांबळे, संगीता भोसले या मार्गदर्शक शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाह्यपरीक्षा विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.