इनरव्हील क्लबच्या डान्स स्पर्धेत जय हो ग्रुपचा प्रथम क्रमांक; महिला डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. इनरव्हील क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिला डान्स स्पर्धा आहिल्याबाई होळकर सभागृह (टाऊन हॉल) येथे उत्साहात पार पडला.ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये जय हो ग्रुप ने प्रथम क्रमांक पटकाविला.
इनरव्हील ने महिलांसाठी व्यासपीठ तयार करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोलो डान्स स्पर्धा व ग्रुप डान्स स्पर्धा आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी महिलांनी डांस स्पर्धेत सहभाग घेऊन खूप छान प्रतिसाद दिला.सध्याच्या धावपळीतून महिलांनी स्वतःमधील कला दाखवण्या साठी संधी ही इनरव्हील ने उपलब्ध करून दिली .
ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक मिलेनियम ग्रुप ने व्दितीय क्रमांक, तृतीय क्रमांक शिवकन्या ग्रुपने तर उत्तेजनार्थ क्रमांक एंजल ग्रुप ने पटकाविला. त्याचप्रमाणे वैयक्तीक डान्स स्पर्धेमध्ये नूर बागवान यांनी प्रथम क्रमांक, ऐश्वर्या दौंडे यांनी व्दितीय क्रमांक, नंदा भंडारे यांनी तृतीय क्रमांक तर उत्तेतजनार्थ क्रमांक विनिता झिंजुरटे यांनी पटकाविला.
सोलो डान्स स्पर्धेसाठी 19 महिला स्पर्धक सहभागी झाल्या तर ग्रुप डान्स साठी 11 ग्रुप सहभागी झाले. सोलो डान्स स्पर्धेमध्ये महिलांनी विविध प्रकारची गाणी सादर केली .यात कोणी लावणी, गोंधळी गीत ,जोगवा गीत, उडत्या चालीचे गीत घेतले होते. ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये लोकनृत्य गीत घेतले होते. प्रत्येक स्पर्धकाने आपली कला, हावभाव ,प्रॉप चा वापर करून आपले सादरीकरण छान प्रकारे सादर केले.
या डान्स स्पर्धेसाठी अकलूजच्या किर्ती देसाई व कोल्हापूरचे सागर जाधव सर परीक्षक म्हणून लाभले. तसेच इनरव्हिल सदस्यांनी भूपाळी सादर केली. स्नेहा कुमठेकर व वैशाली बेले यांनी साऊथ गीत सादर केले.उपस्थित महिलांसाठी इनरव्हीलने लकी ड्रॉ चे आयोजन केले होते.यासाठी सौ. वर्षा देशपांडे यांनी बक्षिसे दिली होती.सदर कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विविध स्पर्धेतील विजेत्या महिला स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
सदर कार्यक्रमास बक्षीस व सन्मानचिन्हचे सौजन्य सूर्योदय अर्बन महिला को ऑफ क्रेडिट सोसायटी व सूर्योदय फाउंडेशन यांनी केले. प्रस्तावना उमा उंटवाले यांनी तर सूत्रसंचालन सुवर्णा इंगवले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सविता लाटणे यांनी सूर्योदय फाउंडेशन, सूर्योदय अर्बन महिला क्रेडिट को ऑप सोसायटी व उपस्थित महिला वर्गाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .