शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे सांगोल्यात..!

राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेऊन प्रकाश झोतात आलेल्या शिवसेना उपनेत्या व सेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख निर्माण केलेल्या सुषमाताई अंधारे आज रविवार दि. २५ रोजी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गद्दारांचा समाचार घेण्यासाठी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शिवसेना नेत्या संजनाताई घाडी यांनी सांगोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण राज्यभर सुरू असलेली महाप्रबोधन यात्रा रविवार 25 रोजी सांगोला येथे येणार आहे या यात्रेत शिवसेना नेते माजी मंत्री भास्करराव जाधव तसेच युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी यांच्यासह अनेकजण सहभागी होणार असल्याचेही संजनाताई घाडी यांनी सांगितले. महाप्रबोधन यात्रा व सुषमा अंधारे यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून सांगोला येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषदेतून त्या बोलत होत्या. यावेळी सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शहरप्रमुख कमरूद्धीन खतीब, भारत मोरे, युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख सौरभ चव्हाण, तुषार इंगळे गोरख येजगर, अरविंद पाटील, असलम मुलानी नवल गाडे शंकर मेटकरी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांनी सेनेत प्रवेश केल्यापासून सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन बंडखोर आमदार व सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. आज रविवारी होणाऱ्या महपबोधन यात्रेत ठाकरे गटाच्या या दोन्ही तोफा लोकप्रिय बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा कसा समाचार घेणार..? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.