युटोपियन शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात; चालू हंगामाकरिता सहा लाख टनाचे उद्दिष्ट–उमेश परिचारक

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या २०२४-२०२५ या अकराव्या गळीत हंगामाचे बॉयलरपूजन व अग्निप्रदीपन समारंभ दि.२१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ठिक दहा वाजता कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्रारंभी कारखान्याचे डे.चिफ इंजिनियर सुदर्शन बर्गे यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, आपल्या कारखान्याचा हा अकरावा गळीत हंगाम असून मागील दहा हंगामात युटोपियनने भरीव कामगिरी केली आहे. चालू गळीत हंगामात ६ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार असलेचा मानस आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून गत दहा हंगामात ऊस उत्पादक हे युटोपियन कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात व यापुढेही देतील अशी मला खात्री आहे.
या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या सुचनेनुसार सांगोला-पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील कारखान्याच्या सभासदांचा व शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल. त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही परिचारक यांनी यावेळी केले. कारखान्याने या वर्षी १० हार्वेस्टर मशिन घेतलेल्या आहेत तसेच २०० ट्रॅक्टर, १५० मिनी ट्रॅक्टर या प्रमाणे करार केले आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक म्हणाले की,संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांना दिवाळी सणासाठी प्रती किलो २५ रु. प्रमाणे १० किलो साखर वाटप करणेत येईल. सर्व कामगार वर्ग हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी कामगारांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ८.३३ टक्के बोनस दिला जाईल.असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी,खातेप्रमुख व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभिजीत यादव यांनी मानले.