वाढेगांव येथे चिखलमय रस्त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना करावी लागतेय तारेवरची कसरत

वाढेगांव ता. सांगोला येथील पिण्याच्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लीटर पाणी वाया जाते तर या पाण्यामुळे रस्ता चिखलमय होत असल्याने विद्यार्थी व नागरिकाना पायी जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाढेगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ गावासाठी पिण्याचा पाणी पुरवठा करणारी टाकी आहे. या पाण्याच्या टाकीच्या जवळूनच वाढेगांव-सांगोला जुना रस्ता असून याच रस्त्याने दररोज नागरिक, महिला, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुर यांची मोठ्या प्रमाणत ये जा सुरु असते. मात्र गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी असणारी पाण्याची टाकी भरून वाहत असल्यामुळे रस्त्यावर चिखल होत आहे. मुळातच हा रस्ता अतिशय खराब असून पावसाळ्यात तर या ठिकाणच्या नागरिकाना नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परीषद व हायस्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थिनीना रस्त्याने चालताना तारेवरची कसरत करत शाळेला जावे यावे लागते.
एकीकडे सरकार पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपये खर्चत आहे. आणि इथे मात्र कित्येक लिटर वाया जाणाऱ्या पाण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला गांभीर्य नाही का ? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे.
जादा झालेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्याना चिखलातून वाट काढावी लागत आहे. ग्रा. पं. प्रशासनाने ही होणारी गैरसोय तात्काळ दुर करावी.
– तानाजी भोसले (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती, वाढेगांव)