महाराष्ट्रशैक्षणिक

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वेरीत विशेष व्याख्यान संपन्न; उत्साही जीवनासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप अत्यावश्यक- योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी

पंढरपूर – ‘खरं तर आज माणूस हा स्वतः हून आजार ओढवून घेत असून स्पर्धेच्या या युगात अधिक गतिमान होत असताना तो स्वतःच्या शरीराकडे व आहाराकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळी माणसं, ऋषीमुनी हे साधारणतः दीडशे वर्ष आपले जीवन जगत होते. परंतु आज लोकांमध्ये योग्य आहार, प्राणायाम आणि पुरेशा झोपेची कमतरता जाणवत आहे त्यामुळे माणसांत आळस निर्माण होत आहे. याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी मी हिमालय, नेपाळ, कन्याकुमारी, पॉन्डीचेरी आदी ठिकाणी गेलो. त्याठिकाणी मानवाचे आजार आणि आहार यावर अभ्यास केला. त्यानंतर असे आढळले की, मनुष्य हा योग्य आहार घेत नाही. त्याचबरोबर प्राणायामाकडे दुर्लक्ष करतो. यामुळे तो स्वतःहून आजारी पडत आहे, वयोमान कमी करून घेत आहे. अलीकडे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता अशा अनेक आजारांना नागरिक आमंत्रण देत आहेत तर ‘हार्ट अटॅक’चे प्रमाणही वाढत आहे. यासाठी आपणच कारणीभूत आहोत. यासाठी अन्नमयकोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष या पाच प्रकारच्या कोषांवर विजय मिळवल्यास माणूस हा अधिकाधिक वर्षे आपले जीवन जगू शकतो तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप असेल तर माणसाचे जीवन उत्साही बनते.’ असे प्रतिपादन योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी यांनी केले.
स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या वातानुकुलीत असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘योग्य आहार आणि प्राणायाम: निरोगी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर कोल्हापूर येथील प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्राचे योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी ‘योग्य आहार कसा असावा व आजारांना कसे रोखता येईल? याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाबरोबरच स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही विकासासाठी सुरुवातीपासून कटिबद्ध असलेल्या स्वेरीमध्ये योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी आजारांबाबतची वास्तवता स्पष्ट करत होते. दिप प्रज्वलनानंतर पुढे गुरुजी म्हणाले की, ‘प्राणायम केल्याने कोणतेही रोग जवळ येत नाहीत. माणूस हा सर्वप्रथम मानसिक दृष्ट्या आजारी पडतो त्यानंतर तो शरीराने आजारी पडतो. म्हणून मानसिकता जोपासणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहावे, जेवणात पालेभाज्या असाव्यात. अधिक तेलकट पदार्थ टाळून नैसर्गिक आहारावर भर द्यावा. निसर्ग भ्रमंती, मैदानी खेळ, नृत्य, संगीत, संभाषण, प्रबोधनपर व्याख्यान ऐकणे, मित्र मंडळी व नातलग यांच्याशी संपर्क वाढवून संवाद साधल्यास माणूस नेहमी उत्साही राहतो.’ असे सांगून गुरुजींनी आजारांचे प्रकार सांगून आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, रक्तवाहिन्या, यकृत, फुफ्फुस हे अवयव कसे तंदुरुस्त राहतील याबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी आजार व आहार यासंबंधीचे प्रश्न विचारले असता गुरुजींनी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी योग शिबिराचे समन्वयक नवीन साळुंखे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार तसेच चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वेरीचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!