सूर्योदयचा आदर्श प्रत्येक मराठी उद्योजकाने घ्यायला हवा-प्रा. नितीन बानुगडे पाटील; एल के पी मल्टीस्टेट खर्डी शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न

सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनीलभाऊ इंगवले व त्यांच्या मित्रांनी गेली अनेक वर्षांपासून या उद्योग समूहाच्या माध्यमातून कितीतरी क्षेत्रात उभा केलेले उद्योगांचे जाळे व मोठ्या प्रमाणावर केलेली रोजगार निर्मिती या गोष्टींचा आदर्श प्रत्येक मराठी उद्योजकांनी घ्यायला हवा. तसेच या उद्योग समूहाद्वारे एलकेपी मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये अनेक शाखांच्या माध्यमातून घेत असलेली भरारी ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व इतिहासाचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
खर्डी तालुका पंढरपूर येथे एल के पी मल्टीस्टेटच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. आज मला परिस्थिती प्रतिकूल आहे, परिस्थिती अनुकूल होईल मग मी काहीतरी करेन , असे हताश होऊन वाट पाहत न बसता , छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन जशी असेल तशा परिस्थितीमध्ये व उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक आज प्रत्येक तरुणांनी बाळगली पाहिजे. पेरणी न करता फळांची अपेक्षा करणाऱ्या पिढीला मी सांगू इच्छितो, आधी सुरुवात करा , मनाची जिद्द बाळगा ,कष्टाची तयारी ठेवा यश तुमचा पायाशी लोळन घेतल्याशिवाय राहणार नाही. असे मौलिक मार्गदर्शन करत बानुगडे पाटील यांनी उपस्थितांना एक तासाहून अधिक काळ मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डी गावच्या प्रथम नागरिक सरपंच मनिषाताई सव्वाशे होत्या. यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जयसिंगतात्या पाटील, एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, व्हाईस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, संचालक जगन्नाथ भगत गुरुजी, संचालक डॉ. बंडोपंत लवटे , संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अरविंद केदार, उद्योजक संभाजी पाटील तसेच खर्डी व तालुक्याच्या परिसरातील अनेक आजी-माजी पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये एल के पी मल्टीस्टेटचा विस्तार, संस्थेची कार्यपद्धती, ठेवीदारांसाठी असलेल्या आकर्षक योजना आणि विविध प्रकारच्या कर्ज योजना सांगत पुढील ध्येय धोरणे व दिशा स्पष्ट केले. तसेच संस्थेच्या प्रगतीला ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे अशा सर्व ग्राहकांचे ऋण व्यक्त केले. सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी यांनी उद्योग समूहाची स्थापना, वाटचाल ,आजपर्यंत सुरू असलेले सूर्योदयचे विविध प्रकारचे सेवाभावी उपक्रम , विविध प्रकारचे सुरू केलेले उद्योग व व्यवसाय तसेच संचालक मंडळ यांच्या विषयीची माहिती यावेळी सांगितली. या उद्योग समूहाने नुकताच प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सहसंस्थापक व दूध विभागाचे प्रमुख डॉ.बंडोपंत लवटे यांचा प्राध्यापक बानगुडे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विजयालक्ष्मी शॉपिंग सेंटरचे मालक सिताराम रोंगे दाम्पत्य यांचाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन, बानगुडे पाटलांचा अंगावर शहारे आणणारा धगधगता विचार, हलग्यांचा कडकडाट, कोल्हापुरी फेट्यांचा साज व कार्यक्रमासाठी जमलेली अलोट गर्दी यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खर्डी शाखेचे शाखा व्यवस्थापक सतीश बहिरे, रोंगे कोळी इत्यादींनी परिश्रम घेतले.