सांगोला नगरपरिषद मार्फत शिवजयंती पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी; 393 व्या जयंतीनिमित्त 393 वृक्षांची लागवड !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीचे औचित्य साधून शहरात विविध ठिकाणी 393 देशी वृक्षांची लागवड करून सांगोला नगरपरिषद मार्फत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभर सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानाची सांगोला नगरपरिषद मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरास पर्यावरण पूरक हरित शहर बनवण्याच्या दृष्टीने नगरपरिषद मार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात असून त्याची जोपासना ही केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. महाराजांची ही 393 वी जयंती असल्याने यानिमित्ताने 393 वेगवेगळी देशी प्रजातीची झाडे लावण्यात येऊन ही जयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी केली गेली. यावेळी वृक्ष लागवड मा.तहसीलदार तथा प्रशासक श्री.अभिजीत पाटील व मुख्याधिकारी श्री.सुधीर गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
*३९३ वृक्ष लागवडीचे ठिकाणे*:
१) साठे नगर पंढरपूर रोड तहसील कार्यालयाच्या मागे – ८०
२) घनकचरा डेपो कडलास रोड –
१९३
३) शासकीय धान्य गोडाऊन परिसर –
८०
४) माळवाडी रोड – ४०
सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियांता श्री तुकाराम माने व नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची टीम यांनी विशेष मेहनत घेतली. ही वृक्ष लागवड मोहीम तहसीलदार तथा प्रशासक श्री.अभिजीत पाटील मुख्याधिकारी सुधीर गवळी, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, कार्यालय अधीक्षक विजयकुमार कन्हेरे, सहायक मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके, सीएलटीसी स्थापत्य अभियंता अमित कोरे, स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे तसेच कार्यालयीन कर्मचारी व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
सांगोला शहरात वृक्ष लागवड व संवर्धन याबाबत जनजागृती होऊन पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने 16 व्या शतकात वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या राजांची 393 जयंती 393 वृक्षांची लागवड करून साजरी करण्याचा हा छोटा प्रयत्न केला.
– डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद