लक्ष्मीनगर येथे नेत्र शिबिर व इतर उपक्रमातून अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाची सामाजिक बांधिलकी – माजी प्रांतपाल प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला (प्रतिनिधी) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून लोकांचे दु:ख मांडले व ते लोकशाहीर झाले.लक्ष्मीनगर येथील अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाने हा विचार प्रमाण मानून अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिर वृक्षारोपण व्याख्यान अशा कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली. असे प्रतिपादन माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचद्र झपके यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ सांगोला व अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ लक्ष्मीनगर यांचे संयुक्त विद्यमाने व विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांचे सहकार्याने आयोजित लक्ष्मीनगर येथील मोफत डोळे तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटन समारंभामध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण,सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके लक्ष्मीनगर ग्रामपंचायत सदस्य .स्वाती साठे , उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. झपके म्हणाले एके ठिकाणी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नेत्ररोग चिकित्सा शिबीर आणि त्याच वेळेला काळाची गरज आणि ऑक्सिजन मिळणारे नैसर्गिक साधन म्हणून अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाने हाती घेतलेला वृक्षारोपण कार्यक्रम, व्याख्यान , आरोग्य तपासणी ही लोकजागृतीच आहे. असे सांगत लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य व क्लबच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली.
सदर शिबिरामध्ये एकूण १०० पेक्षा जास्त लोकांची डोळे तपासणी झाली यामध्ये तीस लोकांना चष्मे देण्यात येणार आहेत व १५ लोकांना मोफत व अल्प दरात नेत्रशस्त्रक्रिया करण्यासाठी सांगली आय हॉस्पिटल मध्ये रवाना करण्यात आले.
या शिबिरासाठी अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य ,लायन्स क्लबचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..



