सांगोला तालुका

आई वडील, गुरुजनवर्ग, नातेवाईक यांच्या संस्कारामुळेच मी सुभेदार मेजर पदापर्यंत पोहोचलो; सुभेदार मेजर तुकाराम बापूसाहेब बाबर

* चोपडी गावचे सुपुत्र सुभेदार मेजर तुकाराम बापूसाहेब बाबर यांचा मान्यवरांकडून भव्य सत्कार सोहळा संपन्न.

सांगोला(दशरथ बाबर); घरची आर्थिक स्थिती बिकट असतानाही बारावी सायन्स पर्यंत शिक्षण घेऊन 26 ऑक्टोबर 1991 साली भारतीय सैन्य दलात दाखल झालो .माझ्या देश सेवेत आई-वडिलांचे कष्ट ,प्रेरणा ,संस्कार उपयुक्त ठरले. चुलते, माजी सैनिक पांडुरंग आऊबा बाबर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा जीवनात उपयुक्त ठरली. सैन्यदलातील अनेक अधिकारी, सैनिकांनी मोलाचे सहकार्य केले .मी कठोर परिश्रम करीत देशाच्या अनेक भागात सेवाकार्य करीत असताना सैनिकी सेवेतील विविध ११ पदके प्राप्त केली .त्यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांची ,वरिष्ठांची मोलाची साथ मिळाली. सुभेदार मेजर पदावरती काम करीत देशसेवेमध्ये 32 वर्ष व्यतीत केली . देशसेवेसाठी माझे आई-वडील, गुरुजनवर्ग, नातेवाईक यांचे संस्कार लाख मोलाचे ठरले. त्यामुळेच मी हे सुभेदार मेजरपद प्राप्त करू शकलो असे गौरवउद्गार सुभेदार मेजर तुकाराम बापूसाहेब बाबर यांनी चोपडी येथे सेवापुर्ती सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

सुभेदार मेजर तुकाराम बाबर यांनी भारतीय सैन्य दलात 32 वर्ष सेवा करून ते सेवानिवृत्त झाले .त्यानिमित्त रविवार दिनांक 10 डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी सैनिक सेवापूर्ती सन्मान सोहळा चोपडी येथे आयोजित केला. त्या प्रसंगी सुभेदार मेजर तुकाराम बाबर बोलत होते.
पुढे बोलताना सुभेदार मेजर तुकाराम बाबर म्हणाले ,आई-वडिलांचे संस्कार कधीच विसरू शकत नाही. गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे व नातेवाईकांच्या सहकार्यामुळे देश सेवेत दीर्घकाळ देशसेवा केली. स्पर्धात्मक युगात तरुण युवकांनी आवडत्या क्षेत्रात प्रगती करावी .सैन्य दलामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी यापुढे मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असेन असे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्तीनंतर भविष्यात माझा परिवार माझ्यासाठी जीव की प्राण असेल .आई-वडिलांचे, गुरुजनांचे संस्कार कधीही विसरू शकणार नाही . असे सांगत त्यांनी आपल्या 32 वर्षाच्या देशातील सेवेविषयी अनेक अनुभव सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले . सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजक, मान्यवर,आजी माजी सैनिक व ग्रामस्थ बंधू-भगिनींचे आभार व्यक्त केले.

यावेळी सेवानिवृत्त सैनिक गणेश चौगुले, उत्तम चौगुले, एकनाथ कोळेकर ,रविकांत मराळ, रावसाहेब साळुंखे, यांनी भारत देश व सैनिकाचे जीवन याविषयी आपल्या मनोगतात सांगितले की , सुभेदार मेजर तुकाराम बाबर यांनी अतिशय उत्कृष्टपणे देशसेवा केली .शिस्तबद्ध नियोजन हे सैन्य दलामध्ये पाहायला मिळते. तुकाराम बाबर यांनी पुढील जीवन आनंदमय जगावे .त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी सैन्य दलामध्ये जाऊन देशसेवा करावी. सैन्य दलामध्ये सेवाकार्य व वर्दी याला विशेष महत्त्व आहे. सुभेदार मेजर तुकाराम बाबर यांनी सैन्य दलातील महत्त्वाचे व उच्चपद प्राप्त करून देशाची सेवा केली. देशाच्या अनेक भागात त्यांनी आपले कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले.

यावेळी माजी मुख्याध्यापक वाय .एस .बाबर ,चेअरमन भिकाजी बाबर यांनी शुभेच्छापर मनोगतात सांगितले की, शालेय जीवनापासून सुभेदार मेजर तुकाराम बाबर हे शिस्तप्रिय होते .पूर्वी कुटुंबातील मुलगा सैन्यात भरती झाला की त्यांचे आई-वडील रडत बसायचे. परंतु सध्या तशी परिस्थिती राहिली नसून अनेक नवतरुण ,युवक देशसेवेसाठी सेनादलामध्ये भरती होण्यासाठी धडपडत आहेत. तुकाराम बाबर यांची देशसेवा लाख मोलाची ठरली आहे. भविष्यात त्यांनी गावातील तरुण पिढीसाठी भरती करिता मार्गदर्शन करावे अशी विनंती करीत त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कारप्रसंगी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी कार्यक्रमप्रसंगी प्रगतशील बागायतदार व युवा उद्योजक सतीश पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सुभेदार मेजर तुकाराम बाबर त्यांनी प्रदीर्घकाळ 32 वर्षे भारतमातेची सेवा करून गावचा लौकिक वाढविला. भारत देशाची सेवा करून ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे भावी जीवन आनंदमय व्हावे, त्यांनी कुटुंबाकरिता अधिक वेळ द्यावा असे सांगत सैन्य दलाविषयी व त्यांनी प्राप्त केलेल्या 11 पदकाविषयी त्यांचा अनेक मान्यवर‌ , गावच्यावतीने करण्यात आलेला सन्मान हा” न भूतो, न भविष्यती “असा असल्याचे नमूद केले..

कार्यक्रमाचे आयोजक रेल्वे पोलीस सतीश जरग व उद्योजक अनिल जगदाळे यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्कृष्ट नियोजन करीत सत्कार सोहळा पार पाडला .. सुभेदार मेजर तुकाराम बाबर यांचा चोपडी गावामध्ये प्रवेश होताच सवाद्य व फटाकांच्या आतषबाजीत त्यांचे महिला भगिनींनी व मान्यवरांनी औक्षण करीत स्वागत केले. त्यानंतर चोपडी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायतीच्या वतीने व विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सरपंच सौ मंगलताई सरगर ,उपसरपंच पोपटशेठ यादव ,चेअरमन भिकाजी बाबर ,यांच्यासह आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या .तसेच जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी यांच्यावतीने त्यांचा सत्कार सोहळा पार पडला . यावेळी सुभेदार मेजर तुकाराम बाबर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले.तसेच मेजर दीपक खंडागळे यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार आला .त्यानंतर गावातून मिरवणूक काढली. ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या घरासमोर सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. उपस्थितासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते .यावेळी तुकाराम बाबर यांच्या कुटुंबीयांकडून व संयोजकाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचाही सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जय जवान आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था सांगोला, आजी-माजी सैनिक चोपडी, आजी माजी सैनिक संघटना वासुद (अकोला), आजी माजी सैनिक व बहुद्देशीय संस्था अकोला वासुद, आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना सांगोला, आजी माजी सैनिक संघटना जवळा या संघटनाच्या वतीने तसेच चोपडी गावातील मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला व भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

व्यासपीठावर सरपंच मंगलताई सरगर उपसरपंच पोपटशेठ यादव ,चेअरमन भिकाजी बाबर ,तांबोळी सर, एस .बी .बाबर सर, सेवानिवृत्त मेजर पांडुरंग शिंदे, रावसाहेब साळुंखे, पंडित साळुंखे, माजी मुख्याध्यापक वाय.एस .बाबर उपस्थित होते . कार्यक्रमासाठी आबासाहेब बाबरशेठ ,जि .प. सदस्य दादाशेठ बाबर, चेअरमन दगडू बाबर ,ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी ॲड.सचिन बाबर, बाळासाहेब यादव, रावसाहेब गोडसे, माजी सैनिक पांडुरंग बाबर , गुरुजनवर्ग ,नातेवाईक, सैन्य दलातील आजी माजी अधिकारी ,मान्यवर,सैनिक, राजकीय नेते मंडळी, मित्रपरिवार ,नातेवाईक व महिला भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत सुनील जवंजाळ सर यांनी केले.
बातमीला फोटो आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!