सांगोला तालुका

अन्यथा, माण नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन करून सरकारला जागे करणार: तानाजी पाटील

सांगोला (प्रतिनिधी):- तात्पुरत्या उपाय योजनांची मलमपट्टी न करता कायमस्वरुपी माण, बेलवन, अप्रूका, कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यासाठी पाण्याची तरतूद करावी. सिंचन योजनेतून नदीला पाणी येणार या आशेवर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, ऊस लागवड केली आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात सुद्धा तालुक्यातील नद्या, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत आहेत. नेतेमंडळींनी याचा गांभीर्याने विचार करून टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा, माण नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन करून नेतेमंडळीसह सरकारला जागे करणार असल्याचे  शेतकरी तानाजी पाटील यांनी सांगितले.
‘आम्हाला नेहमी आंदोलन केल्याशिवाय पाणी मिळणारच नाही का ?  आमच्या तालुक्यावरच पाण्यासाठी अन्याय का होतोय ?’ अशी आर्त हाक देत नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
   नीरा उजवा कालवा सांगोला शाखा फाटा क्रमांक पाचला पाणी मिळावे यासाठी ढाळेवाडी, फाटा महूद या ठिकाणी धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाणी सोडल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असेही शेतकऱ्यांनी सांगितले. नीरा उजवा कालव्याचे पाणी टेल टू हेड याप्रमाणे द्यावे असे असताना देखील सांगोला तालुक्यातील टेलला असणाऱ्या फाट्यावरील मेथवडे, संगेवाडी, मांजरी, शिरभावी इत्यादी गावांना अद्यापही निरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नाही. कालव्याच्या फाट्यांवरील असलेल्या शेवटच्या गावांवरील शेतीसाठी अगोदर पाण्याची व्यवस्था केली असताना देखील पाणी का मिळत नाही असेच येथील शेतकरी बोलून दाखवत आहेत. नीरा उजवा सांगोला फाटा क्रमांक पाचला अद्यापही पाणी दिले नसल्याने या फाट्यावरील शेतकऱ्यांनी ढाळेवाडी, महूद येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलने केली तरच आम्हाला पाणी मिळणार का ? असा सवाल  शेतकऱ्यांनी अधिकारी व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारत आहेत. नियमाप्रमाणे आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या नाहीतर आम्ही अशीच आंदोलने करीत राहणार असेही शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.
दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याची नियोजन का नाही ?
  सांगोला तालुक्यात सध्या पावसाअभावी खरीप पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, विंधन विहिरींची पाणी पातळी खाली गेल्याने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती असताना, नियमाप्रमाणे टेल टू हेड पाणी वाटप दिले पाहिजे असे असताना देखील सांगोला तालुक्यावरच पाणी वाटपासाठी नेहमी अन्याय होत आहे.  तालुक्यातील नीरा उजवा पाणी वेळेवर का व कोणामुळे मिळत नाही ? याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या शेतकरी विचारत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!