अनावधानाने राहिलेले दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस परत करून बँकेतील शाखा अधिकार्याने प्रामाणिकपणाची प्रचिती दिली. सदरची घटना जवळे ता. सांगोला येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवळा येथील नजमा हशमोद्दीन इनामदार (वय-70) या शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता जवळे येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सोन्याचे नेकलेस घेण्यासाठी लॉकर उघडले होते.
अनावधानाने नजमा इनामदार यांचेकडून नजरचुकीने सोन्याचे नेकलेस लॉकरच्या बाहेरच राहिले होते. सोन्याचे नेकलेस न घेताच नजमा इनामदार या घराकडे परतल्या होत्या. त्यानंतर सोन्याचे नेकलेस लॉकरच्या बाहेरच राहिले असल्याचे शाखाधिकारी मोहन ऐवळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून त्यांचा मुलगा साहिल इनामदार यांना फोन करून सोन्याचे नेकलेस राहिले असल्याचे सांगितले. साहिल इनामदार यांना बँकेत बोलवून सदरचे सोन्याचे नेकलेस ताब्यात दिले.
सदरील प्रकाराबाबत जवळा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकारी व कर्मचार्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
यावेळी शाखाधिकारी मोहन ऐवळे, कॅशियर चंद्रशेखर देशपांडे, शिपाई जीवन जगधने, क्लार्क श्रीयोग हेगडे, संकेत घाडगे उपस्थित होते
शाखाधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचार्यांचे मा.आम.दिपकआबा साळुंंखे-पाटील यांनी कौतुक केले आहे.या घटनेवरुन प्रामाणिकपणा अजुनही जिवंत आहे आहे हे यावरून लक्षात आले.