सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

माण नदीमध्ये टेंभूचे पाणी सोडणार – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला (वार्ताहर):- उन्हाळी टेंभू आवर्तन सन २०२२-२३ मधून घाणंद तलाव ते आटपाडी तलाव मार्गे माण नदीमध्ये बलवडी येथे पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

टेंभूचे पाणी आटपाडी तलावामध्ये  शुक्रवारी दुपारच्या पुढे सुमारे ४०० क्युसेस वेगाने माण नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. या पाण्यातून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

यावर्षी पावसाने ओढ दिल्याने सांगोला तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती परंतु निरा उजवा कालवा, टेंभू व म्हैसाळ योजनेतून इतर सर्व गावांना पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे. परंतु माण नदी काठावरील गावांची अडचण दूर करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने शासनाकडे व जलसंपदा खात्याकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना माण नदीमध्ये पाणी सोडण्याची विनंती केली होती यावर शासनाने टेंभूचे पाणी माण नदीमध्ये सोडण्याचे आदेश दिल्याने हे पाणी माण नदीमध्ये सोडण्यात आले आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून मागील तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी उन्हाळी आवर्तनाचे पाणी टेंभू योजनेतून माण नदीमध्ये सोडले आहे या वर्षी पाऊस कमी झाल्याने टेंभूचे पाणी माण नदीमध्ये सोडण्यासाठी विलंब झाला होता. तरी आता पाणी सोडल्याने नदी काठावरील सर्व गावातील बळीराजा सुखावला आहे शिवाय नदीकाठावरील सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये माण नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी करून याचे वीजबिलही शासनाने भरावे अशी मागणी केली होती यावर शासनाने सदर पाळीचे विजबील शेतकरी किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून न घेता शासनाने भरण्याचे मान्य केले आहे.

येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये हे पाणी बलवडी पासून मेथवडे पर्यंत पोहचणार असल्याने माण नदीकाठावरील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न संपणार असल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!