सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांचं डोकं देशहितामध्ये चालत नाही..! ; भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका

 

सांगोला (प्रतिनिधी): एकच मिशन माढा सिंचन हेच भाजपचे मिशन आहे. माढा आणि शरद पवारांच्या बिन विचारांना पाडा असे धोरण मतदारांनी अवलंबिले आहे. देशाचे कृषीमंत्री असताना पवारांनी माढा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याने शरद पवार नावाचं जहाज समुद्राच्या मध्यावरती असून ते तिथं बुडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शरद पवारांना बारामतीच्या गल्ली बोळात फिरावे लागत आहे. शरद पवारांना फक्त कारखाना कडा बंद पाडायचा, सूत गिरणी कशी बंद पाडायची, सातबारा नावावर कसा करायचा एवढंच माहीत आहे. शरद पवारांचं डोकं देशहितामध्ये चालत नाही अशी जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कोळा ता.सांगोला येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाऊसाहेब रूपनर, संभाजी आलदर, सागर पाटील, दादासाहेब लवटे, शिवाजी घेरडे, दुर्योधन हिप्परकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, कृष्णेचे पाणी सांगोल्याला येवू शकते हे सत्यात आणण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले. पाच वर्षांपूर्वी टँकर, चारा छावणी, रोजगार हमी यासाठी संघर्ष करावा लागत होता. या लोकांना आमदारकी दिली, यांचे कारखाने वाचवले, यांना पदे दिली तरीही ही लोकं भाजपसोबत प्रामाणिक राहत नाहीत. विकासासाठी पैसे आणण्याची धमक खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. महायुतीच्या सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नाव दिले, हा धनगर समाजाचा मोठा सन्मान आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी पट्टा असून जनतेने पवारांच्या भूलथापाला बळी पडू नये. सर्वसामान्य माणसाला आमदार करण्याची ताकद भाजप मध्ये आहे. नरेंद्र मोदींनी नीम कोटेड युरियाची निर्मिती तयार करून युरियाचा काळाबाजार रोखला असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, देशाला विकासाच्या वाटेवर नरेंद्र मोदी घेवून जावू शकतात. ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी असून इंडिया आघाडीत लुटारू एकत्रित आले आहेत. आघाडीचे सरकार ७० वर्षात गावगाड्यात रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी देवू शकले नाहीत. मोदींनी सत्तेत आल्यावर देश एकसंघ ठेवला. 370 कलम हटवण्यासाठी निधड्या छातीचा नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान देशाला लाभला आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे इंडिया आघाडी सांगू शकत नाही माढा लोकसभा मतदारसंघ हा क्रांती करणारा मतदारसंघ आहे. गावागाड्यातला माणूस तुमच्या छाताडावर नाचू शकतो हे या मतदारसंघाने सिद्ध केले आहे. रणजितसिंह निंबाळकर यांनी केंद्रातून पैसा आणला, शेतीच्या पाण्याला गती दिली, संपूर्ण रस्त्याचं जाळ विणलं म्हणून विरोधक त्यांच्या विरोधात गेले आहेत. शरद पवारांनी सत्तेत असताना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. सामान्य माणसं राजकारणाच्या पटलावर उभा करण्याचे काम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्या वाड्यावर आयुष्यभर गुलाल उधळला जात होता, ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं. ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी असून देशाच्या हितासाठी मतदारांनी महायुतीचे उमेदवार खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले

 

यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, दादासाहेब लवटे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!