राजकीयमहाराष्ट्रसांगोला तालुका

सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणे महायुतीस पोषक तर शेकापचे प्रतिकूल परिस्थितीतील यश वाखाणण्याजोगे….

डॉक्टर देशमुख बंधुपुढे आगामी काळात पक्षातील गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान

 

सांगोला (अशोक बनसोडे):- शेकापने खवासपुर व वाढेगाव या दोन ग्रामपंचायती नव्याने ताब्यात घेतल्या आहेत तर सावे येथे शेकाप मधील दोन गटात लढत होऊन फक्त खांदेपालट झाल्याने तिथे जैसेथे परिस्थिती राहिली आहे तर चिकमहुद येथे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे त्याठिकाणी परंपरागत असलेला एका प्रभागातील बालेकिल्ल्यात शेकापचा पराभव झाला आहे आगामी काळात नगरपरिषद,जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने बदलत्या राजकीय समीकरणाचा गाव पातळीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीकडे एक चाचणी म्हणून पाहिले तर सध्याच्या महायुती मधील आ.शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील व मित्रपक्ष भाजप यांच्यात येणार्‍या काळात कितपत राजकीय सौख्य राहते यावर निवडणुकीतील यशापयश अवलंबून आहे तर शेकाप नेत्यांतील अंतर्गत सुदोपसुंदी ऐनवेळी कोणते स्वरूप धारण करते यावर तालुक्यातील पुढील सर्व राजकीय रणनीती ठरणार आहे.

सांगोला तालुक्यातील राजकारण दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख व आ.शहाजीबापू पाटील या दोन राजकीय नेत्यांच्या संघर्षातच गेले मात्र माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे जिकडे जातात तिकडे अनुकूल वातावरण होत असते असे विधानसभा निवडणूक निकालावरून दिसून येते मात्र मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिपकआबानी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला पण ऐनवेळी आ.शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा जाहीर केला व जिकडे दिपकआबा साळुंखे पाटील तिकडे गुलाल व विजयाचे पारडे जड हे समीकरण दृढ केले सध्यातरी मा.आ.दिपकआबा व आ.शहाजीबापू पाटील हे विकास कामाच्या नावावर एकत्र असले तरी येणार्‍या काळात पुढे असेच राजकीय गणित राहील हे सांगता येत नाही कारण माजी आमदार दीपकआबा यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची विधानसभा लढवण्याची सुप्त इच्छा बोलण्यातून सतत व्यक्त होत आहे त्यांचे कार्यकर्ते तर आबा आता नाही तर परत कधीही नाही याच भावनेतून विधानसभा निवडणूक लढविण्या बाबत तगादा लावत असल्याचे दिसून येते शेकाप व आ.शहाजीबापू पाटील यांना तिसरा पर्याय म्हणून ते पुढे येवू शकतात का? हे येणार्‍या काळात पहावे लागेल .

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे चित्र पाहता विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना फार मोठा धक्का बसला आहे असे म्हणता येणार नाही कारण चार ग्रामपंचायतीच्या निकालावरून विधानसभेचा अन्वयार्थ काढता येत नाही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कौल शेकापला उभारी देणारा असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत असताना जनतेने तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांना सूचक इशारा देणारा दिला आहे. आगामी काळात नगरपरिषद,जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुका येणार असल्याने बदलत्या राजकीय समीकरणाचा गाव पातळीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीकडे एक चाचणी म्हणून पाहिले तर तालुका व्यापी असणार्‍या आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मताचे अवमूल्यन होत असल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा एकत्रित विचार केला तर भाजप प्रणित महायुतीला तालुक्यात चांगले स्थान देऊन मतदारानी स्वीकारल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतच्या निवडणुका स्थानिक पातळीवर तडजोडी होऊन लढविल्या जातात राज्य पातळीवरील नेतृत्वापेक्षा स्थानिक प्रश्नांना अग्रक्रम देऊन स्थानिक आघाडीच्या हाती सत्ता सोपविली जाते या निवडणूक निकालावरून जनमताच कौल अमुक आमक्याच्या विरोधात आहे आणि या पक्षाला अनुकूल आहे असे म्हणणे धाडसाचे असले तरी वारे कोणत्या दिशेला वाहते आहे याचा मात्र अचूक अंदाज येऊ शकतो.

सांगोला तालुक्यात नुकत्याच झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापने गावपातळीवर आघाडी करून तीन ग्रामपंचायतीमध्ये घवघवीत यश संपादन केल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले असले तरी या विजयाने कार्यकर्त्यांनी हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही . येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत पक्षाला पक्षाअंतर्गत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. दोन्ही डॉक्टर देशमुख बंधुमधील एकोपा टिकवून निवडणुकीसाठी एकसंघपणे सामोरे जावे लागणार आहे. पक्षातील मरगळ व गटबाजीला थारा न देता सावध पावले टाकावी लागणार आहेत शेकापक्षात पूर्वीही गटबाजी नव्हती असे नाही ती होतीच पण दिवंगत आ.गणपतराव देशमुख यांचा शब्द प्रमाण मानून निवडणुकीत एकदिलाने काम केले जात होते आताच्या राजकारणाची परिस्थिती खूप वेगळी आहे. गावपातळीवरील कार्यकर्त्या पेक्षा नेत्यांचा इगो, महत्त्वकांक्षा वाढलेली दिसून येत आहे .एकाला पद दिले तर दुसरा नाराज होतो आहे जो तो नेता राजकारणातील मागील दाखले देवून आपले घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत आहे अन्यथा श्रेष्ठींना वेगळा विचार करण्याची धमकी देताना दिसून येत आहेत. पक्षात राहून पदे पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न जरूर करावा पण जास्त ताणून न धरता पक्षाच्या सोयीची भूमिका घ्यावी पक्षातील काही जुन्या नेत्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे व ते आता नेत्यांनाच आव्हान देवू लागले असल्याचे दिसून येते यामुळे आव्हानविरांसह पक्षाचेही नुकसान होणार आहे विरोधक मात्र नाराजांचा स्वकीया विरुद्ध योग्य वापर करून घेत असल्याचे जाणवते.

पक्षात सर्वकाही आलबेल आहे असे नेत्यांनी काही समजू नये जरी ग्रामपंचायतीत विजय मिळाला असला तरीही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जमेचे राजकारण केले पाहिजे अन्यथा उसने अवसान आणून उर बडवून काहीही साध्य होणार नाही. पक्षापेक्षा मीच मोठा ही धारणा नाराज नेत्यांनी ठेवल्यास सत्तेचा मार्ग खाचखळग्याचा आहे हे विसरून चालणार नाही सध्या डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख हे आपआपल्या परीने पक्षासाठी कष्ट घेत आहेतच पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे असे असले तरी येणार्‍या सर्वच निवडणुकीत जुन्या नव्या कार्यकर्त्यांची दोन्ही डॉक्टर बंधूनी मोळी बांधने गरजेचे आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!