आपुलकी प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला.
सांगोला येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्य व कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन युनिक पार्क सांगोला येथे मोठ्या उत्साहात सोमवारी संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात आपुलकी सदस्यांच्या कुटुंबातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांनी सहभाग नोंदवत आपल्या विविध कलागुणांचे दर्शन घडविले.
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पाच पुरस्कारांचे वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती प्रतिभा बाळासाहेब केदार (वासूद) यांना “कृतिशील आदर्श माता” पुरस्कार, धनंजय नारायण भिंगे (सोनंद) यांना “समाजसेवा प्रेरणा पुरस्कार”, भाऊसाहेब दिगंबर खटकाळे (अकोला) यांना “सृजनशील शेतकरी पुरस्कार” , निखिल साहेबराव देशमुख (सांगोला) यांना “सार्थ स्वाभिमान पुरस्कार”, तर माझ्या परिघात सेवा समूह यांना “आदर्श संस्था पुरस्कार” देऊन यावेळी आपुलकीचे नूतन सदस्य तथा पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा, शाल व रोपाची कुंडी देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्यत्व स्विकारल्याबद्दल ११ नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. स्नेहभोजन दिल्याबद्दल युनिक पार्कचे अण्णासाहेब मदने गुरुजी, वैभव केटरर्स चे वैभव लंबे, साउंड सिस्टीमचे भिवाजी शेम्बडे व दर्श डिजिटलचे सागर ननावरे यांचाही यावेळी सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास आपुलकीचे सदस्य व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपुलकी सदस्य कुटुंबियांचे स्नेहसंमेलन दरवर्षी घेण्यात येते. यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असाच असतो. याच कार्यक्रमात ज्यांचे कार्य मोठे असूनही कोठे दखल घेतलेली नसते अशांचा शोध घेऊन आपुलकीचा पुरस्कार देऊन गौरविले जाते. त्यामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.
– राजेंद्र यादव ( अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान )