वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

नाझरा( वार्ताहार):- नाझरा येथील विद्यामंदिर प्रशाले समोर असणाऱ्या मैदानात विविध वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रक्ताच्या नात्याबरोबर निसर्गाचही नातं जपूया अशा प्रकारचा संदेश देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम हरित सेना विभागाच्या वतीने संपन्न झाला.
मैदानात असलेला वृक्ष हा माझा भाऊ आहे त्या भावाची मी व्यवस्थितपणे काळजी घ्यायला हवी. वृक्ष नावाच्या भावासाठी मी दररोज काही वेळ द्यायला हवा अशा प्रकारची संकल्पना हरित सेना विभागाचे प्रमुख सोमनाथ सपाटे यांनी मांडली.या संकल्पनेला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सकारात्मकता दर्शवली असून येथून पुढे दररोज झाडाला पाणी देणे असेल किंवा झाडाच्या संवर्धनासाठी असणाऱ्या इतर गोष्टी प्रशालेतील विद्यार्थिनी करणार आहेत.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मैदानात असणाऱ्या विविध प्रकारच्या वृक्षांना राखी बांधून त्या वृक्षांची काळजी घेण्याचा संकल्प केला. यावेळी मुख्याध्यापक बिभिषन माने, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,पर्यवेक्षक विनायक पाटील, सोमनाथ सपाटे, वसंत गोडसे, दत्तात्रय जाधव यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



