चिकमहूद येथील तामजाई देवी यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न
पंजाबच्या गौरव मच्छीवाडा याने पटकाविला तामजाई केसरी किताब

महूद, ता. १३ : चिकमहूद(ता.सांगोला) येथील तामजाई देवी यात्रेच्या निमित्ताने नुकतेच निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.या मैदानात पंजाबच्या गौरव मच्छीवाडा याने इराणचा मल्ल हमीद इराणी यास घुटना डावावर चितपट करून तामजाई केसरी किताब,चांदीची गदा व अडीच लाख रुपयांचा पहिला इनाम पटकाविला आहे.या मैदानामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील व परदेशातील मल्लांच्या कुस्त्या झाल्या आहेत.
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील ग्रामदैवत तामजाई देवीच्या यात्रेनिमित्ताने निकाली कुस्त्यांची जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानाचे उद्घाटन दिग्विजय पाटील, सागर पाटील,सुरेश कदम,उपसरपंच तुषार भोसले,यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रमोद हुबाले,नवनाथ भोसले,कालिदास भोसले,धनंजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले.अडीच लाख रुपये इनामाची ही पहिल्या क्रमांकाची कुस्ती गौरव मच्छीवाडा(पंजाब)विरुद्ध हमीद इराणी(इराण) यांच्यामध्ये सुमारे वीस मिनिटे चालली होती.यामध्ये हमीद इराणी याने प्रथम गौरव वर ताबा घेतला होता.मात्र गौरवने यातून सुटका करून घेतली.पुन्हा गौरवने हमीदला हापते डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला.यातून हमीद बचावला.मात्र शेवटी गौरव मच्छीवाडा याने हमीद इराणी यास चितपट करून तामजाई केसरी किताब जिंकला.दुसऱ्या क्रमांकासाठी दोन लाख इनामाची कुस्ती देवा थापा (नेपाळ) विरुद्ध अमित लखा(हरिद्वार) यांच्यात झाली. यामध्ये देवा थापाने विजय मिळविला. दीड लाख रुपये इनामाची तिसरी कुस्ती विक्रम भोसले (खवासपूर)विरुद्ध गद्दी पंजाबी यांच्यात झाली. यामध्ये विक्रम भोसले विजयी ठरला. चौथ्या क्रमांकाची एक लाख रुपये इनामाची कुस्ती सागर चौगुले(जुनोनी)विरुद्ध लखन राजमाने(गारअकोले) यांच्यात झाली. यामध्ये सागर चौगुले विजयी ठरला.
तामजाई केसरीचा मानकरी ठरलेल्या गौरव मच्छीवाडा यास आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख इनाम देण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधान परिषद सदस्य दीपकआबा साळुंखे,अजिंक्यराणा पाटील,अनिकेत देशमुख,प्रणव परिचारक,सद् गुरू साखर कारखाना राजेवाडी चे श्री.सावंत,डीव्हीपी उद्योग समूहाचे अमरजीत पाटील,पडळ येथील माण खटाव ॲग्रो प्रोसेसचे श्री.देशमुख, अशोक माने,बाळासाहेब कोरे,विजय मोरे,बाळासाहेब बंडगर,पंढरी भोसले उपस्थित होते.यावेळी संजय पाटील, महादेव गोडसे,सदाशिव भोसले,सतीश कदम,किशोर महारनवर, नितीन सातपुते,नामदेव पारसे,राजेंद्र भोसले, अजिनाथ जाधव,दशरथ चव्हाण, रणजित कदम,पंकज काटे,दादासाहेब महारनवर,विश्वनाथ फडतरे,कुंडलिक जाधव,शहाजी भोसले,रामचंद्र मुळे, दिनेश सरक,महेश पाटील,धनाजी यादव, कुमार जाधव,अर्जुन ढेंबरे, नवनाथ मोरे,राकेश कदम,देवदत्त भोसले,पांडुरंग वाघमोडे,शंकर बुरुंगले, सुरेश तांबवे,दादासाहेब बंडगर,सागर बाड, समाधान भोसले,साहेबराव घालमे, अजित हत्तीगोटे,अप्पासाहेब बंडगर आदी उपस्थित होते.
कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी प्रमोद हुबाले,कालिदास भोसले, रणजित कदम, बाळासाहेब बंडगर,सुनील मुळे, सोमा मरगर,संतोष सराटे,राजेंद्र कदम, गणेश भोसले,हनुमंत कदम,महेश पाटील,संतोष गाढवे,सतीश भोसले, तानाजी काळेल,प्रकाश कदम यांनी परिश्रम घेतले.कुस्ती समालोचक म्हणून राजाभाऊ देवकते(परांडा) व हनुमंत शेंडगे (मांडवे)यांनी काम पाहिले.यात्रेनिमित्त तामजाई देवीची महाअभिषेक व महापूजा करण्यात आली.मानाचा पालखी सोहळा संपन्न झाला. तर परिसरातील शंभू महादेवाच्या कावडींनी तामजाई देवीला जलाभिषेक घातला.या कावडीच्या वतीने येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
चौकट -१) मतभेद आहेत मात्र मनभेद नाही
शेकाप मधील विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेकापचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी चिकमहूद येथील कुस्त्यांच्या मैदानास यांनी भेट दिली. एकमेकांचे विरोधक असणारे आमदार शहाजी पाटील व डॉ.अनिकेत देशमुख हे एकाच व्यासपीठावर आले.यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.मात्र राजकारणामध्ये आमचे मतभेद जरूर आहेत मात्र मनभेद नाहीत असे सांगत समालोचकांनी कुस्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
चौकट २) मल्लांनाही शहाजी बापूंच्या डायलॉग आणि व्यक्तिमत्त्वाची भुरळ
कुस्ती मैदानासाठी आलेल्या नेपाळच्या देवा थापा व पंजाबच्या गौरव मच्छीवाडा यांना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गुहाटी येथील डायलॉग पडली.त्यांच्या डायलॉगच्या ढब मध्ये बोलत देवा थापा यांनी कुस्ती मैदानाचे वर्णन करताना क्या माहोल है,क्या दंगल है,क्या पब्लिक है,क्या रौनक है,शहाजीबापू कहते है सब कुछ ओके है… असे सांगून तमाम कुस्ती शौकिनांना खुश केले.