मौन पाळून चालणार नाही…

विधान परिषदेतील आमदार पदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचे दिग्गज नेते  आ.जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळे शेकापच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विशेष म्हणून त्यांच्या उमेदवादीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला होता. पाटलांचा पराभव म्हणजे शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पराभवाची अनेक तर्‍हेने चिकित्सा केली जात  आहे. अनुमान बाहेर येईल पण करणार काय.हा खरा प्रश्न आहे.कुणाला दोष देणार आणि कुणावर कारवाई करणार.

शिवसेना ठाकरे गटाने मदत करण्यास दिलेला नकार आणि काँग्रेसने अतिरिक्त मते देण्यास दर्शविलेली असमर्थता यातूनच शेकापचे जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत दारुण पराभव झाल्याचे सांगण्यात येते.  या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील मतभेदही समोर आले. मित्रपक्षांनी हात झटकले असताना निवडणूक लढण्याचा जयंत पाटील यांचा हट्ट आणि पुरेशी मते नसतानाही तिसरा उमेदवार उभा करण्याच्या निर्णयाने महाविकास आघाडीचेच हसे झाले. विधानसभेतील संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येणारे हे निश्चित होते. पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

15 मते असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचाही पाठिंबा राष्ट्रवादीने अपेक्षित धरला होता. पण शिवसेना ठाकरे गटाने पाटील यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली तसेच  नार्वेकर यांच्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त मतांची बेगमी केली. तेव्हाच पाटील यांचा निभाव लागणे कठीण असल्याचे चित्र  स्पष्ट झाले होते.  पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असतानाही शिवसेनेने परस्पर नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांंचे  म्हणणे  आहे. महाविकास आघाडीत योग्य समन्वय साधला गेला असता तर अधिक बरे झाले असते, अशी बोलकी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. शेकापचे जयंत पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल, असे राष्ट्रवादीचे गणित होते. पण लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेच्या अनंत गीते यांना शेकाप किंवा जयंत पाटील यांनी शेवटच्या क्षणी मदत केली नाही, असा आरोप झाला होता. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना मदत केल्याची तक्रार गीते यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती.

शेकापचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. तसेच मावळ मतदारसंघातील पनवेल, उरणमध्येही शेकापच्या मदतीबद्दल ठाकरे गट साशंक होता. यामागे जयंत पाटील यांची ‘कुरघोडी’ जबाबदार होती, असे बोलले जाते. यातूनच उद्धव ठाकरे गटाने जयंत पाटील यांना मदत करण्यास ठाम नकार दिला होता. शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना अतिरिक्त मते कशी मिळतील यासाठी प्रयत्न केले.काँग्रेस नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. निवडणुकीच्या दिवशी व आधीही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीच्या ठिकाणी हजेरी लावली. जयंत पाटील यांना काँग्रेसकडून मदतीची अपेक्षा होती. काँग्रेसने पहिल्या पसंतीची दोन मते द्यावी तसेच दुसर्‍या पसंतीची मते नार्वेकर आणि त्यांंना वाटून द्यावी, अशी मागणी केली होती. पण काँग्रेसने पहिल्या पसंतीची मते जयंत पाटील यांना दिली नाहीत तसेच दुसर्‍या पसंतीची मते नार्वेकर यांना हस्तांतरित केली. काँग्रेसने आपल्याला मते दिली नाहीत, असा नाराजीचा सूर जयंत पाटील यांनी पराभवानंतर लावला.

जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची 12 मतेच मिळाली. पाटील यांनी अपक्ष, समाजवादी पार्टी व एमआयएमची मते मिळविण्याचा प्रयत केला. पण कोणाचीच मते मिळालेली दिसत नाहीत. विधानसभेत शेकापचा एक आमदार असला तरी त्याची भाजपशी जास्त जवळीक आहे. परिणामी ते मतही मिळाले नसावे. कारण आपलीही मते फुटल्याची कबुली जयंत पाटील यांनी दिली. एकेकाळी राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद तसेच राज्याच्या राजकारणात महत्वाची  भूमिका बजाविणार्‍या  शेतकरी कामगार  पक्षाचे अस्तित्वच  धोक्यात  आले  आहे. पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात शामसुंदर शिंदे हे आमदार असले तरी ते नावापुरते शेकापचे आमदार आहेत. त्यांची जवळीकही महायुतीशी अधिक आहे. ते महायुतीच्या बाकांवरच सभागृहात बसतात. गेली 24 वर्षे आमदार असलेले जयंत पाटील पराभूत झाल्याने विधान परिषदेतही शेकापचे प्रतिनिधित्व  संपुष्टात आले.

रायगड जिल्ह्यातही पक्षाचा एकही आमदार नाही. एकूणच पक्षाची भविष्यातील वाटचाल खडतर असल्याचेच चित्र  दिसते. विधान परिषद निवडणुकीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला म्हणून अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे  आमदार चिखलात लोळले. समाजमाध्यमांवर त्यांचे छायाचित्र  आणि चित्रफिती  सध्या  मोठ्या  प्रमाणात  प्रसारित झाल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला तर मातीत लोळीन, असा निर्धार आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी जे प्रयत्न करावे  लागतील ते करीन पण  त्यांना  विजयी होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले.

या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांच्या या पराभवानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला निर्धार शनिवारी पूर्ण केला. राजमळा येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह चिखलयुक्त मातीत लोळणच घेतली.  शेकाप म्हणजे कामगार,कष्टकरी आणि शेतकरी यांचा बुलंद आवाज समजला जातो.विधान परिषदेतील जयंत पाटलांची भाषणे लक्षवेधी असायची.ते लढवय्या नेते.जुन्या पिढीतील नेत्यांची जी फळी होती,त्यापैकीच ते होत. सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांचेनंतर शेकापमध्ये पाटलांचा बुलंद आवाज होता.तो बंद होईल,असे दिसते. शरद पवारांनी त्यांच्या पराभवाविषयी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.पवारांनी मौन पाळून चालणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button