बर का साहेब..!”… उखडलेल्या रस्त्याकडेही लक्ष असू द्या

नाझरा(वार्ताहार):- गेल्या तीन महिन्यापूर्वी शिवाजीनगर ते चोपडी आणि शिंदे पाटी ते चोपडी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी काम अतिशय झपाट्याने पूर्ण केले. नागरिकांमधून रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात होते, त्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून सदर काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाताना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे संबंधित खात्याचे “साहेब” या रस्त्याकडे कधी लक्ष देणार आहेत..
या उखडलेल्या रस्त्याकडेही साहेबांचे लक्ष असावे.. अशा प्रकारचा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर ते चोपडी या दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी उखडून वरती आली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत, दुचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरच्या धुराळाने चोपडी गावातील बाजारपेठ पूर्णपणे माखुन जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानदारांना या रस्त्याचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या धुराळामुळे अनेकांना घशाचा त्रास जाणवत आहे.
गावातील दुकानदार या रस्त्याच्या कामाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. शिंदे पाटील चोपडी पर्यंत येणारा रस्ता आहे दुरावस्थेत गेला आहे त्या भागातून येणाऱ्या नागरिकांना या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दूध उत्पादक शेतकरी, शाळेकडे जाणारे विद्यार्थी सातत्याने ये-जा करत असतात या सगळ्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाजीनगर ते चिंध्यापीर हा रस्ता दुरुस्त केला आहे परंतु अनेक ठिकाणी या नवीन रस्त्याचे डांबर उखडून गेल आहे. त्याकडे ठेकेदाराने लक्ष दिले नाही,पहिल्याच पावसात खळगे मळा येथे असणाऱ्या पुलावरच डांबर एका बाजूने निघून गेले आहे, तोही रस्ता दुरुस्तीसाठी वाट पाहतोय.
संबंधित खात्याचे “साहेब”सदर रस्त्याकडे लक्ष देणार आहेत का? ज्या ठेकेदाराकडे या रस्त्याचे काम आहे तो ठेकेदार लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.संबंधित रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास चोपडीकर आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.



