नाझरा विद्यामंदिर मध्ये नवगतांचे उत्साहात स्वागत; चिमुकल्यांच्या चिवचिवाटाने शाळा झाली बोलकी

नाझरा(वार्ताहार):- उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज सकाळी शाळेची घंटा वाजली असंख्य चिमुकले प्रचंड उत्साहात शाळेकडे येताना दिसत होते.यामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दल प्रचंड कुतूहल होते,नवीन दप्तर,नवीन वह्या, नवीन पुस्तक, नवीन शाळा,नवीन शिक्षक अशा सगळ्या नवनवीन गोष्टींमध्ये विद्यार्थी रमून गेले होते.नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात नवोदित विद्यार्थ्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले.
इयत्ता पाचवी चे विद्यार्थी ज्या वर्गात बसतात तो वर्ग रंगीत फुग्यांनी सजवलेला होता, त्याचबरोबर विविध प्रकारच्या फुलांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले,विद्यार्थ्यांच्या हस्ते पाचवीच्या सजवलेल्या वर्गाची फीत कापून प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रवेश संपन्न झाला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनेकांना प्रोत्साहित करणार होता. चिमुकल्यांच्या चिवचिवाटाने शाळेच्या भिंती बोलक्या झाल्याचे चित्र दिसत होते.आज सर्व विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. त्याचबरोबर नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आहे पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांचे स्वागत प्रचंड उत्साहात करण्यात आले.
सर्वप्रथम कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन पाचवी चे नवीन विद्यार्थी, उपस्थित पालक,प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील,चारुदत्त जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कॉपीमुक्त अभियानाची शपथ सोमनाथ सपाटे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.त्यानंतर  नवनियुक्त  प्राचार्य बिभीषण माने यांचा पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.ग्रंथपाल दत्तात्रय जाधव यांच्या नियोजनातून सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप उपस्थित पालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये तसेच नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बदलीने व नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला तसेच बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना यथोचित सन्मानित करून निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button