जगज्जेता भारत

गेल्या तेरा वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला हुलकावणी देणारा विश्वकरंडक उंचावून कर्णधार रोहित शर्माने शनिवारी जेतेपदाचा दुष्काळ संपविला. सन २०११मध्ये मायदेशातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा आणि सन २०१३मधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकल्यानंतर जेतेपदाला गवसणी घालण्यात भारताला अपयश येत होते. या काळात भारतीय संघाची कामगिरी खूप खालावलेली होती, असेही नाही. सन २०११नंतरच्या सर्व एक दिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धांत भारत उपांत्य फेरीत दाखल झाला होता. गेल्या वर्षी तर तो साखळीतील सर्व सामने जिंकून अतिशय थाटात अंतिम फेरीत आला होता. मात्र, जेतेपदाचा तो अंतिम सामना भारताला जिंकता आला नाही. त्याच्या आधीच्या वर्षीच्या टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीतूनच भारताला परत फिरावे लागले होते. कसोटी क्रिकेटमधील जगज्जेतेपदासाठी स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून दोन्ही वेळा भारत अंतिम फेरीत पोहोचला; परंतु दोन्ही वेळा विजयापासून दूर राहिला. क्रिकेटच्या तिन्ही अवतारांत एक शक्ती म्हणून उदयाला आलेल्या भारताला महत्त्वाच्या स्पर्धांतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांत येत असलेल्या अपयशामुळे ‘चोकर्स’ ही हेटाळणीदर्शक उपाधीही मिळाली होती. या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि त्याचे शिलेदार शनिवारी बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना खेळण्यासाठी उतरले. या सामन्यातही एक क्षण असा आला, की प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका सहज जिंकेल, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, हरत असलेला हा सामना जिंकण्याची करामत भारतीय संघाने दाखवली आणि पुन्हा एकदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली.

हे विश्वविजेतेपद केवळ टी ट्वेंटी क्रिकेटपुरते मर्यादित नाही. डोळ्यात स्वप्ने घेऊन जिद्दीने त्यांच्या पूर्ततेसाठी अविरत कष्ट करणाऱ्या तमाम भारतीयांच्या आकांक्षांचेही ते प्रतीक आहे. विकासाच्या दिशेने निघालेल्या भारताच्या आत्मविश्वासाचेही ते प्रतीक आहे. एका अर्थाने हा भारतासाठी ‘लगान क्षण’ही आहे. क्रीडा क्षेत्रातील यश देशाच्या सर्वंकष कामगिरीसाठी पूरक ठरत असते; म्हणूनच हे जगज्जेतेपद अमूल्य आहे. कोट्यवधी क्रिकेटवेडे भारतीय या विजयाच्या क्षणाकडे डोळे लावून बसले होते. हा क्षण साकारल्यानंतर त्यांना झालेला आनंद हा भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा किंचितही कमी नव्हता. हा विजय कोणा एकाच्या किंवा दोघांच्या कामगिरीवर साकारला गेलेला नाही. संघातील सर्व खेळाडू, राहुल द्रविड यांच्यासह अन्य सर्व मार्गदर्शक, निवड समिती, संघ व्यवस्थापन या साऱ्यांचा हा सांघिक विजय आहे. रोहित शर्मानेही हीच गोष्ट अधोरेखित केली आहे. वैयक्तिक कामगिरीमुळे ख्यात असलेल्या नायकांचा संघ म्हणजे भारत, अशी स्थिती आता राहिलेली नाही. संघाला जिंकून देण्यासाठीच खेळ करण्याच्या भिनत चाललेल्या वृत्तीतून आणि कठीण परिस्थितीत आपले मनोबल उंचावण्यातून हा विजय साकारला आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय खेळाडू अग्रस्थानी नसले, तरी सर्व सामन्यांत अपराजित राहण्याची आणि पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणण्याची असामान्य कामगिरी करण्याची किमया त्यांनी केली आहे. हेच भारताच्या विश्वविजेतेपदाचे गमक आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधील आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ही घोषणा करण्यासाठी त्यांना याहून चांगला मुहूर्त शोधूनही सापडला नसता. वैयक्तिक कामगिरी, जिंकण्याची भूक, लय आणि शारीरिक तंदुरुस्ती पाहता ते आणखी काही काळ ते क्रिकेटच्या या लघुस्वरूपात खेळू शकले असते; परंतु कोठे थांबावे याचे भान त्यांनी दाखविले. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्यांचे नाव कायमच आदराने घेतले जाईल. या स्पर्धेत रोहित शर्मा दिसला तो एक आक्रमक फलंदाज आणि परिपक्व कर्णधार म्हणून. आकांडतांडव न करता मैदानावर शांत राहून निर्णय घेण्याची त्याची शैली दीर्घ काळ स्मरणात राहील. या स्पर्धेत विराट कोहलीची बॅट तळपली नाही; परंतु जिथे गरज होती, त्या अंतिम सामन्यात तो खेळपट्टीवर ठाण मांडून राहिला आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. यातूनच त्याचे मोठेपण सिद्ध होते. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शकपदाच्या कार्यकाळाचा शेवटही गोड होतो आहे. भारतीय संघाला या स्थानापर्यंत आणण्यातील त्यांचे योगदान विसरण्यासारखे नाही. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, सूर्यकांत यादव, शुभम दुबे, मोठ्या अपघातातून येऊन गगनाला गवसणी घालणारा ऋषभ पंत यांसह अनेक नवीन प्रतिभावान खेळाडूंच्या हातात भारतीय संघाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची खात्रीही या जेतेपदाने दिली. त्यांच्यातील विजिगिषु वृत्ती अशीच वृद्धिंगत व्हावी, हीच अपेक्षा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button