चटका लावणारी एक्झिट

असा कसा रे तू पिन्टू, आठ पंधरा दिवसाच निमीत्त होत काय,दवाखान्यात ऐडमिट होतोस काय,अन अचानक ऐन उमेदीत निघुन जातोस काय ? सारं कसं अचानक घडल,अकल्पित झाल,अन तू भरल्या मैफिलीतून निघुन गेलास.
वडिल( दादा ) आणि आई ( वहिनी ) यांच्या वयाचा तरी विचार करायचास.दादाच्या स्वभावा प्रमाणे तू ही स्पष्ट वक्ता होतास.कोणास आवडो,न आवडो आपली भूमिका ठामपणे मांडायचस.प्रसंगी आम्हा बहिणीचा रोष देखिल पत्करायचा.मात्र तू आपल्या मतावर ठाम असायचा.मुळात घरात तू सर्वात लहान,शेंडेफळ,त्या मुळे लाडोबा,सगळ्यांचा लाडका.हुशार,बुद्धिमान,गोरा पान,देखणा,विनोद खन्ना,जितेंद्र फिके पडतील ,असं देखण रुप.अतिशय निग्रही व प्रचंड आत्मविश्वास.या जोरावर लहान पणी प्रचंड आबाळ होवूनही तू डिप्लोमा इंजि.झालास.
स्व्तःमधली बुद्धीमत्ता घरातील वादावादीत वाया घालवू नकोस,हा माझा टोमणा कदचित तुला झोंबला असावा.त्यामुळे तू पेटलास,बी.ई .केलस,नंतर एम.टेक.केलेस,एम.बी.ए केलेस.प्रगती करण्या साठी पुणे,बारामती,सोलापुर,गुजरात,कर्नाटक इतक्या ठिकाणी नोकरी करुन डोंबिबली येथे कंपनीत मोठ्या पदावर अधिकारी म्हणून विराजमान देखिल झालास.पुणे येथे नांदेड सिटी येथे घर घेवून ठेवलेस.
रिटायर झालो की वेळापूर येथे येवुन शेतात फार्म हाऊस बांधणार व निवांत राहणार असे तू म्हणायचस.आम्ही सगळे ते गमतीने घ्यायचो.पल्लवी,तुझी बायको तिलाही तू असच म्हणायचास.तुम्ही मायलेकी नांदेड़ सिटी मध्ये रहा,मी मात्र वेळापुरी जावुन निवांत राहणार.तुझ हे स्वप्न मात्र तुझ्या अकाली जाण्याने अपूर्णच राहिल.अतिशय मेहनती,बुद्धिमान,स्पष्टवक्तेपणा,प्रामाणिक स्वभावा मुळे तू कंपनीत लोकप्रिय होतास.
रुबाब्दार व देखणया व्यक्तीमत्वामुळे तू सर्वाना हवा हवासा होतास.आपल्या जवळेकर घराण्यात तू आणि मुकुंद यानी शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून प्रगती साधली.मात्र दोघंची अशी अकाली पन्नाशीतली एक्झिट सर्वानाच चटका लावून गेली.पन्नाशीतील असा तरुण,कर्तबगार मुलगा सर्वांना सोडून जाताना पाहणे या सारखे दुसरे दुख्ह जगात नाही.पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा,दोष ना कुणाचा असे गदिमा सांगून गेले आहेत,ते खर्या अर्थाने सार्थ आहे……भावपूर्ण श्रद्धांजली.
मनिषा ठोंबरे,सांगोला.



