एक आदर्श स्थितप्रज्ञ पुरुष – गुरूवर्य वि.ए. उर्फ आण्णासाहेब झपके

नुकताच  14 जुलै. गुरूवर्य आण्णासाहेब झपके यांचा 51 वा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण, घराण्याची पार्श्‍वभूमी, बालपण, शिक्षण, स्वभाव, कार्य यावर प्रकाश टाकणारा हा लेख. मागील पिढीत बरीच मोठी माणसे होऊन गेली. नवीन पिढीस त्यांचा परिचय व्हावा, यासाठी हा लेखन प्रपंच….
माझ्या 92 वर्षांच्या जीवनात व वकिल क्षेत्रातील कार्यकाळात विविध स्वभावाच्या अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांचा परिचय झाला. त्यातील काही व्यक्तिंचा दीर्घ सहवास मिळाला. विविध प्रकारचे प्रसंग, घटना, त्यामुळे आलेले अनुभव, स्वतःचे जीवन व समाजजीवनाचा सहसंबंध यातून मानवी जीवनाचे दर्शन घडत गेले. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये भेटलेल्या अनेक व्यक्तींमध्ये गुरूवर्य आण्णासाहेब झपके हे एक आगळे, वेगळे आणि अपवादात्मक व्यक्तिमत्व होते. या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. झपके आण्णांचे पूर्ण नाव विश्‍वनाथ एकनाथ झपके हे होते. त्यांना सर्वजण आण्णा म्हणत. झपके आण्णा व माझे दिवंगत वडिल कै.भीमराव चव्हाण या दोघांची सांगोल्यात मेसर्स चव्हाण आणि झपके कंपनी ही भागीदारी होती. या भागीदारीत सावकारीचा व्यवसाय होता. सोने आणि चांदी खरेदी व विक्रीचा व्यवहार करणारी पेढी म्हणून तालुक्यात सन 1935 ते 1981 पर्यंत ही पेढी कार्यरत होती.
आण्णांना एकुलते एक सुपुत्र होते. ते म्हणजे कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके हे होत. या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करणे जरूर वाटते व ती म्हणजे माझे वडिल व आण्णासाहेब झपके हे वेगवेगळ्या जातींमध्ये जन्मास आलेले होते. झपके आण्णा हे लिंगायत समाजाचे व चव्हाण आण्णा हे मराठा समाजाचे होते. त्यांच्या वयात अंतर होते. स्वभावदेखील भिन्न होता. तरीदेखील दोघांची भागीदारी ही परस्परावरील विश्‍वासाने त्यांनी पेढीस फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते असे म्हटले तर ते वावगे ठारणार नाही. “ऐसी भागीदारी या तालुक्यात पुन्हा होणे नाही’’ असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या दोघांमध्ये शाब्दिक तक्रारी अगर संवाद मी कधीही ऐकला नाही. त्यांचे परस्पर प्रेम व विश्‍वास सख्या बंधुंनाही लाजवणारा होता. तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या जगात, विश्‍वासाच्या जाती धन्य होय ही उक्ती त्यांच्यासाठी तंतोतंत खरी ठरणारी होती.
पूर्वीच्या काळापासून सांगोला सोन्याचे ही म्हण प्रचलित आहे. सुमारे 150 ते 200 वर्षांपूर्वी लिंगायत समाज हा अतिश्रीमंत घराण्यात मोडणारा होता. त्याकाळी सांगोल्यात श्रीमंत घराण्यामध्ये मुख्यतः बंद्रे, सोळसे, हूंडेकरी, महाजन, पैलवान, झपके, ढोले, चांदणे, लोखंडे, गुळमिरे अशी नावे प्रामुख्याने घेतली जात होती. कालांतराने परिस्थिती बदलत जावून झपके यांच्या घराण्यातील परिस्थिती खालावली. व्यापार, उद्योग थांबला. फक्त जमिनी तेवढ्या शिल्लक राहिल्या. त्यातच आण्णासाहेबांचे वडिल एकनाथ झपके यांचे सन 1907 साली प्लेगच्या साथीत निधन झाले. आण्णासाहेब हे 1907 पासून शिक्षक असल्याने त्या काळात त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले व त्या विद्यार्थ्यांनी लौकिक प्राप्त केला. असे अनेक विद्यार्थी त्यांच्या भेटीस येत असत.
आण्णासाहेब हे जातीभेद मानत नसल्याने त्यांचे सर्व समाजावर प्रेम होते. विशेषतः दलितवर्गावरील त्यांचे प्रेम सर्वांना ज्ञात होते. चर्मकार समाजातील दलितमित्र सुखदेव नाथजी खडतरे हे 100 वर्षांपूर्वी पुण्यात जाऊन स्थिर झाले. शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर नोकरी केली. खडतरे यांच्याप्रमाणे आण्णासाहेबांनी अनेक दलित विद्यार्थ्यांना पुढे आणले. इंग्रजी व्याकरणकार तर्खडकर यांची पुस्तके वाचून त्यांनी इंग्रजी ज्ञान प्राप्त केले. जगाचा नकाशा, त्यातील देश, लोक, समुद्र, नद्या, कालवे या सर्वांचा तपशील असलेला भुगोल त्यांना तोंडपाठ होता. सन 1939 ते 1945 या काळात जगात दुसरे महायुध्द सुरू होते. त्यावरील बातम्या व लेख दैनिक सकाळमध्ये नेहमी प्रसिध्द होत असत. जगाचा नकाशा पुढे ठेवून त्या लेखांचे वाचन झपके आण्णा करत असत. सांगोला तालुक्यातील कोळे या गावी त्यांनी बराच काळ शिक्षक म्हणून काम केले. त्या काळी वाहनाची सोय नसल्यामुळे तेथून सांगोलला येण्यासाठी त्यांना पायी 20 मैलांची पायपीट करावी लागत असे. यासाठी त्यांना बुध्देहाळ ते मिसाळ पाचेगांव या गावावरून पायी प्रवास करावा लागत असे.
झपके आण्णा व चव्हाण आण्णा या दोघांची सांपत्तिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर त्यांनी राजकारण, शिक्षण, नगरपालिका व अन्य संस्थांचा कारभार यात भाग घेणे सुरू केले. ही गोष्ट त्यांच्या स्पर्धक लोकांना न आवडल्याने त्या दोघांच्या बदल्या दूरवर करण्यात आल्या. त्यामुळे स्वाभिमानी असलेल्या या दोघांनी शिक्षक पदाचा राजीनामा देवून स्वतःचे कार्यक्षेत्र निर्माण करून सावकारी पतपेढीची स्थापना 1935 साली केली. तेव्हापासून चव्हाण-झपके यांची भागीदारी व व्यवसाय अखंडपणे 45 वर्षे टिकून राहिला.
आण्णासाहेब झपके हे सांगोला येथील विकास सेवा सह. सोसायटीचे अनेक वर्ष चेअरमन होते. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संस्थेस ‘अ’ वर्ग प्राप्त करून दिला. सर्व आर्थिक जबाबदारी स्वतःकडे ठेवून मुलगा बापूराव यांना शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठी पूर्ण मोकळीक व मुभा दिली. त्यामुळेच बापूसाहेबांना त्यांच्या आयुष्यात शैक्षणिक व सामाजिक जीवनात अखंड कार्य करता आले. बापूसाहेबांचे कार्य, त्यांचा गांधीवाद व त्यांचे शिक्षणावरील प्रेम हे सर्वांना परिचित आहेच.
आण्णासाहेबांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई यांचे 1927 साली निधन झाले. त्यावेळी बापूसाहेब झपके हे केवळ 5 वर्षांचे होते. आण्णांची प्रकृती उत्तम असताना, समाजात मान-मान्यता व प्रतिष्ठा असूनदेखील त्यांनी दुसरा विवाह केला नाही. या बाबतीत घरच्या लोकांचा आग्रहदेखील त्यांनी मानला नाही. त्यांना प्रापंचिक सुख लाभले नाही. तथापि या सुखदुःखाबद्दल त्यांनी कोणाजवळ कधी बोलून दाखवल्याचे मला आठवत नाही. ते स्वभावाने मितभाषी होते. गप्पा-टप्पात वेळ घालविणे, मौजमजा करणे त्यांना आवडत नसे.धार्मिक कर्मकांडात ते गुंतून पडले नाहीत. त्याकाळी अकोला येथील सरदार कै.शामराव लिगाडे हे बडे प्रस्थ होते. ते आण्णांचे हितचिंतक मित्र होते.
त्यांच्या आग्रहामुळे व मित्रांच्या मागणीमुळे आण्णांनी सांगोल्यातील राजकारणात सहभाग घेण्यास सुरूवात केली. सन 1940 मध्ये ते सांगोल्याचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सन 1945 साली आमचे वडिल चव्हाण मास्तर हे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. सन 1974 ते 1980 या कालावधीत मी स्वतः लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो. आण्णांचे सुपुत्र बापूसाहेब हे गांधीवादी असल्याने ते केवळ नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून राहिले. मात्र बापूसाहेबांचे सुपुत्र प्रा.प्रबुध्दचंद्र झपके व धर्मपत्नी शोभनतारा उर्फ बाईसाहेब झपके यांनी अल्पकाळ का होईना नगरपालिकेचे अध्यक्षपद भुषविले. त्यामुळे नगरपालिकेतील झपके घराण्याचा सहभाग हा दीर्घकाळ होता.
चव्हाण-झपके यांची भागीदारी ही 1936 पासून कार्यरत होती. सन 1952 साली झपके आण्णांचे सुपुत्र बापूसाहेब झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करून सांगोला विद्यामंदिर प्रशाला सुरू केली. त्यासाठी चव्हाण यांनी संस्थेसाठी मोठे आर्थिक सहाय्य केले. आज सांगोला विद्यामंदिर व परिवाराचा जो नावलौकिक आहे, त्याचे श्रेय चव्हाण-झपके भागीदारीला निश्‍चितपणे द्यावे लागेल.
आणासाहेब झपके हे स्थितप्रज्ञ व चारित्रसंपन्न व्यक्तिमत्व असून त्यांनी एकप्रकारे 36 वर्षे सन्यस्त जीवन आंगिकारले. गीतेमधील अध्याय दोन मधील अनेक लक्षणांचा व गुणांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात समावेश होता. यामध्ये सुख-दुःखापलिकडे चित्ताची समता। येणे उन्मत्तते जगे-जयाशी खंडू न लगे। उन्मत जगामुळे ज्याचे स्थिर अस्थिर होत नाही । दया, क्षमा, शांती । हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात अखेरपर्यंत टिकून राहिले.
आण्णांची आई काशीबाई यांचे 1942 साली निधन झाले. त्यावेळी बापूसाहेब हे काँग्रेस आंदोलनामध्ये विद्यार्थी म्हणून सक्रिय भाग घेत होते. त्यावेळी ते सांगोल्यात आल्यानंतर त्यांना पोलीस खात्याकडून स्थानबध्द करण्यात  आले व त्याच रात्री रेल्वेने पुण्यात नेवून येरवड तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. यावेळी बापूसाहेबांचे वय केवळ 20 वर्षे असल्याने त्यांना एक वर्षाचा तुरूंगवास भोगावा लागला. मुलाचा तुरूंगवास व आईचे निधन या दोन्ही घटना एकाचवेळी घडल्याने आण्णासाहेब झपके यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र या दुःखास ते विलक्षण धैर्याने सामोरे गेले. अशी दुःख सोसण्याची कमालीची सहनशीलता आज कोणाकडे पहाण्यास मिळत नाही. संयम, मनोधैर्य व कोणत्याही प्रसंगता शांती ढळू न देता सर्वांशी चांगले संबंध ठेवणे या त्यांच्या गोष्टी आजही माझ्या मनात असून त्या स्फूर्तीदायक ठरल्या आहेत.
आण्णासाहेब झपके यांचे वयाच्या 83 व्या वर्षी 14 जुलै 1973 रोजी निधन झाले. तर त्यांचे मित्र भीमराव चव्हाण यांचे 23 मे 1981 रोजी निधन झाले. त्या मानाने बापूसाहेब झपके हे अल्पायुषी ठरले. वयाच्या 59 व्या वर्षी 16 सप्टेंबर 1981 रोजी त्यांचे निधन झाले.
आण्णासाहेबांचे नातू प्रशुध्दचंद्र झपके हे कोल्हापूर येथे स्थिर असून दुसरे नातू प्रफुल्लचंद्र झपके हे पाटबंधारे विभागातून मोठ्या पदावरून निवृत्त होवून पुणे येथे स्थिर झाले आहेत. सध्या आणासाहेबांचे थोरले नातू प्रा.प्रबुध्दचंद्र व प्रशुध्दचंद्र हे संस्थेचा कारभार पाहात आहेत.
आण्णांचे कार्य कशा स्वरूपाचे होते, याची माहिती बहुदा त्यांच्या नातेवाईकांसदेखील पूर्णपणे माहित नाही. त्यामुळे हा लेख लिहून आण्णांनी माझ्यावर केलेल्या संस्काराचे स्मरण व्हावे हा हेतू या लेखामागे असल्याने तो सफल होईल अशी आशा वाटते. अशा या थोर स्थितप्रज्ञ पुरूषास माझ्यासारख्या 92 वर्षांच्या वृध्दाचा साष्टांग प्रणाम !
– अ‍ॅड. पृ.भी.चव्हाण,
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, सांगोला
——————————-
शब्दांकन ः प्रा.राजेंद्र ठोंबरे(सर)
सांगोला मो. 9921850059

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button