बेबंदशाही…

केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात सनदी अधिकार्‍यांची बेबंदशाही सुरू आहे.यूपीएससी,एमपीएससी आणि नीट परिक्षेतील घोटाळा पाहिल्यानंतर सामान्य माणूस आज म्हणत आहे की,ही तर प्रशासकीय बेबंदशाही. बेबंदशाहीच्या संदर्भात प्रकर्षाने आठवते ती ग्रीक पौराणिक कथांतील एक म्हण जिचा मतितार्थ असा की, ‘देवाला ज्यांचा नाश करायचा असतो त्यांना तो आधी वेड लावतो- त्यांची बुद्धी भ्रष्ट करतो’. लोकमान्य टिळकांनी 100 वर्षांपूर्वी असाच एक प्रश्न विचारला होता, पण तो त्यावेळच्या परकी राजसत्तेच्या संदर्भात होता. आता हा प्रश्न भेडसावतोय की, हे वेड सत्ताधार्‍यांना लागले आहे, की आपणा सर्वांना लागले आहे. कोणी काहीही करेना, त्याचे आपल्याला काही वाटेनासे झाले आहे. सर्वच क्षेत्रात बेबंदशाही दिसून येत आहे आणि सत्ता किंवा पैशांचा जोरावर ती समाज स्वीकृत करून घेता येऊ लागली आहे.

राज्यकर्ते यात धंदेवाईक राजकारणी व नोकरशाहही जनतेला नागरिक न मानता प्रजा समजतात. गेले काही दिवस वर्तमानपत्रात गाजवत असलेले पूजनीय व्यक्तिमत्व याच मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारे आहे. कोणत्याही ज्येष्ठ सरकारी अधिकार्‍याच्या कार्यालयात गेल्यावर तो एका भल्या मोठ्या टेबलामागे बसलेले असतात. समोर रांगेने मांडलेल्या खुर्च्यांवर लोक लाचारपणे बसून असतात आणि त्याहून अधिक लोक कार्यालयाबाहेर निमूटपणे आपला नंबर येण्याची वाट पाहत असतात. अगदी तहसीलदार कार्यालयापासून ते केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यालयांपर्यंत हेच दृश्य पहायला मिळते. हे दृश्य एका दरबारी मनोवृत्तीचे दर्शन घडवते. तिथे जाणार्‍या व्यक्तीस ही जाणीव करून देण्यात येत की तुम्ही नागरिक नसून कुठल्या तरी राजाची किंवा संस्थानिकाची प्रजा आहात. अलीकडेच वाचनात आले की, महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या अदमासे साडेसतरा हजार जागांसाठी साडेसात लाखांच्या आसपास अर्ज आले होते. याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. उल्लेखनीय गोष्ट अशी की पोलीस मुख्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार यात सुमारे 41 टक्के उमेदवार उच्च शिक्षित आहेत- डॉक्टर, अभियंते, आयआयटी, एमबीए श्रेणीतील आहेत. प्रश्न हा पडतो की हे उच्च शिक्षित अर्जदार फक्त बेरोजगारी मुळेच इकडे वळले असावेत का? सकृतदर्शनी बेरोजगारी हे सरकारी सेवेत जाण्याचे मुख्य कारण आहे असे भासले तरी सरकारी सेवेचे ‘फायदे’ हेही एक महत्वपूर्ण कारण आहे.

देशसेवा हे कारण किती अभिलाषी देतात तो एक शोधाचा विषय आहे. आपण ऑल इंडिया सर्विसेसचे उदाहरण घेऊया. एके काळी आयएएस व आयएफएस यांच्यापैकी जे गुणवत्ता यादीत सर्वांत वर असत, ते आयएफएसचा पर्याय निवडत. आता असे म्हणतात की गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळवूनही आयएफएसमध्ये जाण्याकड े उमेदवारांचा कल नसतो. सर्वांत अधिक पसंती आयआरएस म्हणजे आयकर सेवेत जाण्यास असते. कारण स्पष्ट आहे. याच पठडीतली एक वास्तविकता ही देखील आहे की आयएफएसपेक्षा आयएएसला जास्त पसंती असते. यशस्वी उमेदवारांची यादी बघितली लक्षात येते की, यात बरेचसे उमेदवार आयआयटीतून उत्तीर्ण अभियंते वा एमबीबीएस असतात. म्हणजे ज्यांना त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रातील संधी मिळू शकतात तेही सरकारी नोकरीत. कारण उघड आहे, आयएएस व आयपीएसमध्ये मिळणारा मानमरातब. आयएएस व आयपीएस यांना वर उल्लेख केलेल्या महाराजांची उपमा दिली तर वावगे होणार नाही. तसेच हेही दु:खद सत्य आहे की देशांतर्गत सनदी सेवांत पैसे कमावण्याची संधीही मोठी असते. मोठे घर, गाडी, क्लब मेंबरशिप, नोकरीची सुरक्षितता, वेळेवर पदोन्नती व निवृत्तीनंतर कोणत्यातरी सरकारी प्राधिकरणात मिळणारे पद. आणि हे विधान जेवढे केंद्र सरकारच्या पहिल्या श्रेणीतील नोकर्‍यांना लागू आहे . तेवढेच कमी-अधिक प्रमाणात राज्य सेवेतील पदांसही लागू होते. गेल्या दोन-तीन दशकांत आपण या ठिकाणी कसे आलो? थोडा विचार केला तर जाणवेल की समाजाची झपाट्याने बदललेली मानसिकता हे मुख्य कारण आहे. लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास नाहीसा झाला आहे व यंत्रणांना कसे हाताशी धरावे व स्वतःचा फायदा करून घ्यावा हे ‘कसब’ लोकांच्या अंगवळणी पडले आहे.

पैसे खालपासून वरपर्यंत पुरवले जातात हे एक विदारक सत्य आहे. कुठल्या पोस्टिंगसाठी काय दर सुरू आहे हे रस्त्याच्या कोपर्‍यावर उभे राहून गप्पा मारणार्‍या टोळक्यांच्या चर्चा ऐकल्यास लक्षात येते. भारताची अर्थव्यवस्था चंगळवादी होण्याचे हेदेखील एक मुख्य कारण आहे. जर आपल्या परिचित सोनाराकडे चौकशी केली तर कळते की त्यांचा मोठा ग्राहक वर्ग सरकारी कर्मचार्‍यांचे नातेवाईक हा असतो. निश्चलनीकरण झाले, जीएसटी लागू झाला, तरीसुद्धा रोख रकमेचे एवढे मोठे व्यवहार कसे होऊ शकतात, या प्रश्नाचे उत्तर शोधणं रोचक ठरेल. कुठलाही पक्ष सत्तेत आला तरी ही परिस्थिती बदलणार नाही. त्याासाठी समाजाच्या मानसिकतेत आमूलाग्र बादल व्हावा लागेल. आणि तो बदल होण्यासाठी आतापासून प्रयत केले तरी एक दोन तीन पिढ्या गेल्यानंतरच त्यााचे फळ आपल्याला कदाचित दिसेल.सर्वच क्षेत्रातली ही बेबंदशाही एक दिवस अराजकतेचा आमंत्रण देईल.जनतेने देखील याचा विचार केला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button