सांगोला विद्यामंदिरमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूंचा सत्कार

सांगो़ला (प्रतिनिधी) आयुष्याच्या वाटेवर भेटलेले शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य संपन्न करीत असतात. समाजाचा भौतिक विकास सत्ता वा यंत्राने होत असला तरी आत्मीक विकास हा ज्ञानयंत्राने होत असतो. अशाकाळात ज्ञाननिष्ठेने कार्यरत शिक्षक समाजाचे खरे उध्दार कर्ते व दिशा देणारे गुरु आहेत हा विचार प्रमाण मानून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे गुरूपौर्णिमेनिमित्त शिक्षक गुरुंचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आद्यगुरु महर्षी व्यास व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळ सत्रात नववी ते बारावीतील व दुपार सत्रात पाचवी ते आठवीतील प्रातिनिधिक विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी बारावी शास्त्र विद्यार्थींनी प्रतिक्षा बंडगर व प्रशालेचे सहशिक्षक वसंत गुळमिरे यांनी गुरुमहात्म सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले,प्रशाला उत्सव विभाग प्रमुख बापूसो सावंत, ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.तानसिंग माळी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रदिप धुकटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तानसिंग माळी , चैतन्य कांबळे, प्रा.सौ.माधुरी पैलवान, उन्मेष आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अर्चना कटरे , दत्तात्रय पाटील यांनी केले.