महूद येथे बांधलेल्या विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था; विश्रामगृहाचा समाजकंटकांकडून गैरवापर

महूद: पाटबंधारे विभागासाठी ब्रिटिशांनी सुमारे ९५ वर्षांपूर्वी महूद येथे बांधलेल्या विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून या विश्रामगृहाचा समाजकंटकांकडून गैरवापर केला जात आहे.येथील देखण्या विश्रामगृहाच्या इमारतीचे संवर्धन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अतिवृष्टी होणाऱ्या राज्याच्या भागात धरणे बांधून,या धरणातील पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी ब्रिटिशांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली होती.यानुसार सातारा जिल्ह्यात भाटघर येथे धरण बांधून त्याचे पाणी कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना देण्याची सुविधा निर्माण केली होती.यासंबंधीतील कामे सन १९२० ते १९३० या कालावधीत करण्यात आली. याच दरम्यान सांगोला तालुक्यातील महूद येथे सन १९२९ मध्ये ब्रिटिश राजवटीत प्रशस्त विश्रामगृह उभारण्यात आले होते.या भागात चाललेल्या सिंचन सुविधांच्या कामांची पाहणी करता यावी.या कामावर देखरेख ठेवता यावी, या उद्देशाने ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हे प्रशस्त विश्रामगृह उभारण्यात आले होते.दगडी भिंती, सागवानी दरवाजे, विश्रांतीची उत्तम सोय,बैठक व्यवस्था अशा सर्व सोयी सुविधायुक्त हे विश्राम गृह उभारण्यात आले होते.

सन १९३० मध्ये या परिसरात प्रत्यक्ष सिंचनाची सुविधा सुरू झाली.सुरुवातीच्या काळात विविध ब्रिटिश अधिकारी या विश्रामगृहात राहिले होते.पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येथे असलेल्या सुमारे १८ एकर परिसरामध्ये अधिकारी,कर्मचारी,पाटकरी यांना राहण्यासाठी सुनियोजित उत्तम वसाहत निर्माण करण्यात आली होती.

या ठिकाणी अनेक अधिकारी व कर्मचारी राहत होते.पुढे स्वातंत्र्यानंतर महूद येथे पाटबंधारे उपविभागाचे कार्यालय उभारण्यात आले.त्यामुळे या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी रहात होते.येथून गावच्या व परिसराच्या शेती विकासाचे विविध उपक्रम राबवून पाण्याचे नियोजन केले जात होते.

पाटबंधारे विभागाचे फलटण,पुणे येथील वरिष्ठ अधिकारी या भागात आल्यानंतर याच विश्रामगृहात मुक्काम करून येथील कामकाजाची पाहणी करत असत. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची,कर्मचाऱ्यांची व शेतकऱ्यांच्या विविध बैठका याच विश्रामगृहावर होत असत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभा असलेली व विकासाची साक्षीदार असलेली ही देखणी इमारत सध्या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.सन १९७४ मध्ये महूद येथील पाटबंधारे उपविभागाचे कार्यालय पंढरपूर येथे हलविण्यात आले.त्यानंतर अलीकडच्या सुमारे २० वर्षापासून या परिसरात उतरती कळा लागली आहे.उपविभागीय कार्यालय पंढरपूरला गेल्यानंतर येथे कर्मचारी, अधिकारी यांचे राहण्याचे प्रमाण कमी झाले.कर्मचारी वसाहत व विश्रामगृह ओस पडले.

या परिसरात समाजकंटकांचा वावर सुरू झाला. विश्रामगृह व कर्मचारी वसाहती मधील सागवानी दरवाजे,फर्निचर आदी वस्तू चोरट्यांनी पळविले आहे.या ठिकाणी दारू,मटका,जुगार,प्रेमी युगलांचा वावर यामुळे हा परिसर बदनाम झाला आहे. येथे नियुक्त असलेले काही कर्मचारी विविध कारणांनी सांगोला,पंढरपूर येथे राहत आहेत.यामुळे या परिसराचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ह्या विश्रामगृहाची डागडुजी करून त्यास गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

बदललेल्या प्रथा व विश्रामगृहांची दुरावस्था

पूर्वी शासकीय अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जेवणे ही संकल्पना रूढ नव्हती.राहणे,विश्रांती घेणे,शेतकरी कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घेणे यासाठी प्रामुख्याने विश्रामगृहांचा वापर केला जात होता. पाटबंधारे विभागाशिवाय इतर विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांनाही हे विश्रामगृह नाममात्र शुल्क मध्ये उपलब्ध करून दिले जात होते.सध्या या संकल्पनाच बदलल्या आहेत.पाटबंधारे विभागाचे पंढरपूर ,महूद,माळशिरस,धर्मपुरी, फलटण,वीर धरण,राजेवाडी या ठिकाणी विश्रामगृहे आहेत. यापैकी राजेवाडी येथील विश्राम गृह पूर्ण नामशेष झाले आहेत तर महूद व माळशिरस येथील विश्रामगृह नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

————————————-
हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेमध्ये अतिक्रमणाची भीती

येथील पाटबंधारे वसाहत, विश्रामगृह हा संपूर्ण परिसर १८ एकरांचा आहे.मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तसेच या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने या क्षेत्रात अतिक्रमण सुरू झाले आहे. राजेवाडी(जि.सांगली) येथे पाटबंधारे विभागाची सुमारे दोन हजार एकर जमीन व तलाव आहे.मात्र या ठिकाणीही कर्मचारी नसल्याने त्यास कोणीच वाली नाही.

————————————-

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button