अप्रतिम कलाविष्काराने नाझरा विद्यामंदिर मध्ये शिक्षण सप्ताहातील सांस्कृतिक दिवस साजरा

नाझरा(वार्ताहार):- शिक्षण हक्क कायदा 2020 कायद्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर शिक्षण सप्ताह साजरा होतोय.या शिक्षण सप्ताहातला आजचा 4 था दिवस सांस्कृतिक महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.या सांस्कृतिक महोत्सवात लावणी, भारुड,लोकगीत, भक्तीगीत,अभंग,गवळणी, जात्यावरच्या ओव्या, पोवाडा, पाळणा, देशभक्तीपर गीत त्याचबरोबर विविध प्रकारचे कलाविष्कार नाझरा विद्यामंदिरच्या रंगमंचावर साजरे करण्यात आले.
सर्वप्रथम नटराज्याच्या मूर्तीचे पूजन प्राचार्य बिभीषण माने,इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, ज्युनिअर कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महेश विभुते, प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख संभाजी सरगर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर विविध प्रकारच्या कलागुणांचा अविष्कार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साजरा झाला. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी ओंकार उमेश वाघमारे याने वाजवलेल्या ढोलकीच्या बोलावरती अनेक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. ढोलकीचे अप्रतिम बोल त्याने सादर केल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावण्या,पोवाडा,देशभक्तीपर गीत यांना उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
उपस्थित पालकांकडून सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक करण्यात आले. इयत्ता पाचवीच्या वर्गापासून ते बारावीच्या वर्गापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्या ना कोणत्या कलाविष्काराच्या प्रकारात आपला सहभाग नोंदवला. कलाविष्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो,हे कलागुण पुढील काळात विकसित होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य बी एस माने यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागातील सुनील जवंजाळ, मारुती सरगर,मंजुश्री ओतारी,लक्ष्मी कुकडे, विक्रांत कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.